२५ वर्षानंतर पुण्यातील बालेवाडीत रंगणार बिली जीन किंग कप २०२५ चा थरार..

39
Pune Billie Jean King Cup 2025 Pune Sport News Balewadi
२५ वर्षानंतर पुण्यातील बालेवाडीत रंगणार बिली जीन किंग कप २०२५ चा थरार..

Pune Billie Jean King Cup 2025 : महाराष्ट्रातील पुण्यात २५ वर्षानंतर प्रथमच बिली जीन कप २०२५ टेनिसचा थरार रंगणार आहे. ही स्पर्धा येत्या ८ ते १२ एप्रिल दरम्यान बालेवाडी क्रीडा संकुलात पार पडणार आहे. महाराष्ट्र राज्य लॉन संघटना व अखिल भारतीय टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भारतीय महिला टेनिस संघासाठी ‘सुहाना मसाले’ हे मुख्य प्रायोजकत्व असणार आहेत. अशी माहिती सुहाना समूहाचे अध्यक्ष राजकुमार चोरडिया यांनी माध्यमांना बोलत असताना दिली.

पुढे ते म्हणाले की, गेल्या तीन वर्षांपासून आम्ही टेनिस क्षेत्राला पाठिंबा देत असून आता भारतीय महिला संघाला बिली जीन किंग कपसाठी पाठिंबा देताना अभिमान वाटत आहे. याचबरोबर या स्पर्धेत भारतीय महिला टेनिस संघ जागतिक गट प्ले ऑफ साठी पात्र ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.दरम्यान पुण्यात होणाऱ्या बिली जीन किंग कप २०२५ च्या स्पर्धेच्या नवीन किटचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

संघाच्या संदर्भात माहिती देताना स्पर्धा संचालक सुंदर अय्यर यांनी सांगितले की, भारतीय संघाचे नेतृत्व आशियाई कांस्य विजेती अंकीता राइना हिच्याकडे सोपवण्यात आले आहे. त्याचबरोबर संघात सहजा यमलापल्ली, श्रीवल्ली रश्मिका भामीदीप्ती व वैदेही चौधरी यांच्यासह डब्ल्यूटीए मुंबई ओपन टेनिस स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या प्रार्थना ठोंबरेचा समावेश आहे. अनुभवी प्रार्थनामुळे भारतीय संघाची ताकद वाढणार असून संघात युवा खेळाडू माया राजेश्वरण या 15 वर्षीय खेळाडूचा समावेश राखीव खेळाडू म्हणून करण्यात आला आहे.

मागच्या वर्षीच्या स्पर्धेत भारतीय संघाला चीन आणि दक्षिण कोरिया पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकवर राहावे लागले होते. न्यूझीलंड विरुद्धच्या निर्णायक सामन्यात एका विजयाची गरज असताना भारतीय महिला टेनिस संघाला १-२ असा पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, यंदा घरच्या मैदानावर सामने रंगणार असून भारतीय महिलांकडून दमदार कामगिरीची अपेक्षा असणार आहे. बालेवाडी येथे रंगणारा बिली जीन किंग कप २०२५ टेनिस प्रेमींना विनाशुल्क पाहता येणार असून त्यासाठी पुणे सज्ज झाले आहे. अशी माहिती पीएमडीटीएचे सचिव अभिषेक ताम्हणे यांनी दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा