३५ दिवसानंतर पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा १ हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद

पुणे, २६ नोव्हेंबर २०२०: सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात खरेदीसाठी लोकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. दिवाळीच्या महिनाभर आधीच लोकांनी पुण्यातील रस्त्यांवर गर्दी करण्यास सुरुवात केली होती. खास करून कपडे खरेदीसाठी लक्ष्मी रोड व आजूबाजूच्या भागात मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहण्यास मिळाली. परिणामी आता पुण्यातील रुग्णसंख्ये मध्ये पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यात बुधवारी तब्बल १ हजार २५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. ३५ दिवसांच्या खंडानंतर पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा १ हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यापूर्वी २१ ऑक्टोबर रोजी १ हजार २० रुग्ण आढळले होते.

विशेष म्हणजे काही महिन्याआधी पुण्याने मुंबईला देखील मागे टाकत कोरोनाच्या बाबतीत पहिला नंबर पटकावला होता. देशातील सर्वात प्रभावी शहर म्हणून पुणे ठरलं होतं. मात्र, मागच्या महिन्यामध्ये पुण्यामध्ये रुग्णांची संख्या कमी होताना पाहण्यास मिळाली होती. पण, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लोकांनी केलेल्या गर्दीचा आता परिणाम दिसून येत आहे. दहा दिवसांपूर्वीची आकडेवारी बघितली तर, म्हणजे १६ नोव्हेंबर रोजी पुण्यात केवळ ३५९ रुग्णांची नोंद झाली होती.

दिवाळीनंतर प्रशासनानं चाचणी करण्यावर देखील भर दिला आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात एकूण ११ हजार ५७२ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. पुणे जिल्ह्यात सध्या विविध रुग्णालयात ४ हजार ३८२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ६ हजार ३५७ रुग्ण घरातच उपचार घेत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा