तब्बल एक वर्षानंतर नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर

नवी दिल्ली, ११ ऑगस्ट २०२३ : मुंबईतील कुर्ला येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी २०२२ रोजी ईडीने अटक केली होती. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम यांच्याशी संबंधित प्रकरणात मलिक यांना अटक झाली होती. दाऊद इब्राहिम यांच्याशी आर्थिक व्यवहार करणे तसेच त्याच्या बहिणीशी जमीन व्यवहार करण्यासंदर्भातील हे प्रकरण होते. या कारणावरुन नवाब मलिक यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर नवाब मलिक आधी ईडी कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडीत होते. तब्बल एका वर्षानंतर त्यांना दोन महिन्यांसाठी जामीन मिळाला आहे. प्रकृतीच्या कारणावरुन त्यांना जामीन मिळाला आहे.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयने (ईडी) अटक केली होती. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि कुविख्यात गुंड दाऊद इब्राहिम यांच्याशी आर्थिक व्यवहार तसेच त्यांच्या बहिणीशी जमीन व्यवहार प्रकरणामुळे मलिक अडचणीत आले होते. अटक केल्यानंतर त्यांनी अनेकवेळा जामिनासाठी अर्ज केला. उच्च न्यायालयानेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. परंतु सर्वोच्च न्यायालायने प्रकृतीच्या कारणामुळे दोन महिन्यांसाठी त्यांचा जामीन मंजूर केला आहे.

नवाब मलिक यांना किडनीचा आजार आहे. या आजारावर उपचारासाठी जामीन मिळण्याची मागणी नवाब मलिक यांनी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा हा अर्ज मंजूर करत वैद्यकीय कारणासाठी दोन महिन्यांचा जामीन मंजूर केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा