मुंबई, ३० सप्टेंबर २०२३ : अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. रवी राणा यांच्या या दाव्यानंतर विरोधकांनी पलटवार केला आहे. अजित पवार यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात शरद पवारही भाजपसोबत सत्तेत सहभागी होतील, असा दावा रवी राणा यांनी केला आहे.
एवढेच नाही तर त्यांनी याचा कालावधीही सांगितला आहे. येत्या पंधरा-वीस दिवसात पवार साहेब मोदींसोबत असतील. रवी राणा पुढे म्हणाले की, राजकारणात काहीही अशक्य नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या अगोदर मुख्यमंत्री होते ते उपमुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे हे नगर विकास मंत्री होते ते मुख्यमंत्री झाले तर अजित पवार राज्याचे विरोधी पक्ष नेते होते ते उपमुख्यमंत्री झाले.
शरद पवार मोदींच्या बरोबर आल्यास अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात. असे विधान रवी राणा यांनी केले आहे. रवी राणा यांच्या दाव्यानंतर विरोधकांनी त्यांना प्रत्युत्तर दिलेे. ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी राणा यांना खोचक टोला लगावत म्हटले की, रवी राणा यांनी हे भाष्य करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांची परवानगी घेतली होती का? त्याचबरोबर राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरू असल्याचेही सचिन आहिर म्हणाले.
न्युज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर