तब्बल ६० वर्षांनंतर नागालँडला मिळाली पहिली महिला आमदार; हेकानी जाखलू यांच्या विजयाने रचला इतिहास

नागालँड, २ मार्च २०२३ : नागालँडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आज गुरुवारी (ता. २ मार्च) मतमोजणी सुरू आहे. ६० मतदारसंघांत एकूण १८३ उमेदवार निवडणूक मतमोजणीच्या रिंगणात आहेत. राज्यात जवळपास सर्वच सामाजिक प्रश्नांवर महिला नेतृत्वाच्या भूमिकेत आहेत; परंतु गेल्या ६० वर्षांत नागालँडला एकही महिला उमेदवार नव्हती; पण या विधानसभा निवडणुकीत चार महिला रिंगणात होत्या. त्यापैकी भाजपचा मित्रपक्ष असलेल्या ‘एनडीपी’च्या उमेदवार हेकानी जाखलू दिमापूर-३ मधून विजयी झाल्या आहेत.

त्यांच्या निवडीमुळे तब्बल ६० वर्षांनंतर नागालँडला पहिली महिला आमदार मिळाली आहे. हेकानी जाखलू यांच्या विजयाने नागालँडने नवीन इतिहास रचला आहे.

नागालँडच्या आमदार हेकानी या ४८ वर्षीय ‘एनडीपी’च्या नेत्या आहेत. त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आहे. हेकानी यांच्याकडे ५.५८ कोटींची संपत्ती आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी स्वतःवर ४१.९५ लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असल्याचेही जाहीर केले आहे.

नागालँडला १९६३ मध्ये राज्याचा दर्जा मिळाल्यापासुन ६० सदस्यीय सभागृहात एकही महिला आमदार निवडून आलेल्या नव्हत्या. गेल्यावर्षी एस. फांगनॉन कोन्याक (राज्यसभा सदस्य) यांनी या ईशान्येकडील राज्यातून पहिल्या महिला खासदार बनून इतिहास घडविला होता; पण आता ६० वर्षांनी एक महिला आमदार निवडून आल्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा