‘अमूल’नंतर आता ‘या’ ब्रॅण्डच्या दूध दरात वाढ

5

नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर २०२२: दिवाळीपूर्वी सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसलाय. अमूलनंतर मदर डेअरीनेही दुधाचे दर वाढवले ​​आहेत. खरं तर, दिल्ली-एनसीआरमधील सर्वात मोठी दूध पुरवठादार असलेल्या मदर डेअरीने फुल क्रीम दूध आणि गायीच्या दुधाच्या दरात प्रति लिटर २ रुपयांची वाढ केलीय.

खर्च वाढल्याने केली दरवाढ

खर्च वाढल्याने ही दरवाढ करण्यात आली असल्याचे मदर डेअरीकडून सांगण्यात आले आहे. फुल क्रीम दुधाचे दर ६१ रुपये प्रतिलिटरवरून ६३ रुपये, तर गायीचे दूध आता ५३ रुपयांवरून ५५ रुपये प्रतिलिटर झाले आहे. दिल्ली-एनसीआर आणि उत्तर भारतातील इतर काही बाजारपेठांमध्ये किंमती वाढल्या आहेत.

आज रात्री १२ वाजल्यापासून नवे दर लागू

मदर डेअरीच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही फक्त फुल क्रीम आणि गाईच्या दुधाच्या व्हेरियंटच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांनी वाढ करत आहोत. ही दरवाढ आज पासून म्हणजेच १६ ऑक्टोबर २०२२ पासून लागू होईल.

मदर डेअरीने यंदा तिसऱ्यांदा वाढवले ​भाव

मदर डेअरीने यंदा तिसऱ्यांदा दुधाच्या दरात वाढ केली आहे. मार्चमध्ये दिल्ली-एनसीआरमध्ये दुधाच्या दरात लिटरमागे २ रुपयांनी वाढ करण्यात आली होती. यानंतर ऑगस्टमध्येही याच भागात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ केली होती.

अमूलने देखील वाढवले दर !
दरम्यान, अमूलने शनिवारी दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ केली आहे. यासह फुल क्रीम दुधाचा दर ६१ रुपयांवरून आता ६३ रुपये प्रति लिटर झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडू शकते. यापूर्वी १७ ऑगस्टपासून अमूल दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा