शिवसेनेचे पक्षचिन्ह गोठवल्यानंतर राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना दिले ‘हे’ आदेश

मुंबई, १० ऑक्टोबर २०२२: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी दोन्ही गटांना शिवसेना हे नाव वापरता येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. आता यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांसाठी आदेश काढला आहे.

काय म्हणाले राज ठाकरे ?

महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडी, केंद्रीय निवडणूक आयोगाचा शिवसेनेचे चिन्ह आणि नाव गोठवण्याचा निर्णय, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची न्यायालयीन लढाई या सारख्या मुद्यांवर पक्षाच्या सैनिकांनी कोणतीही भूमिका मांडू नये, असे राज ठाकरेंनी सांगितले आहे. तसेच राजकीय घडामोडींवर माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकांनी, कुठल्याही माध्यमांवर अथवा सोशल मीडियावर बोलू किंवा लिहू नये. योग्य वेळ आली की मी या सगळ्यावर भूमिका मांडेन, असे त्यांनी आवाहन केले आहे.

दरम्यान, शनिवारी निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले. त्यामुळे शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे पर्यायी इतर तीन चिन्ह सुचवून त्यापैकीच एक चिन्ह देण्याची मागणी केली आहे. यामध्ये मशाल, उगवता सूर्य आणि त्रिशुळ या चिन्हांचा समावेश आहे. याशिवाय आपल्या गटाचे नाव हे १) शिवसेना बाळासाहेब ठाकरे २) शिवसेना प्रबोधनकार ठाकरे आणि ३) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे मिळावे अशी मागणी आयोगाकडे केली आहे. दरम्यान, आजच शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्या नव्या चिन्हाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा