लिथियमनंतर आता सापडला सोन्याचा साठा… हे ३ जिल्हे देशाला करणार का श्रीमंत?

पुणे, २८ फेब्रुवारी २०२३: जम्मू-काश्मीरमध्ये लिथियमचा खजिना मिळाल्यानंतर आता भारताला आणखी एक जॅकपॉट मिळालाय. ओडिशातील ३ जिल्ह्यांमध्ये सोन्याचे साठे असल्याचे संकेत आहेत. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण आणि ओडिशाच्या भूगर्भशास्त्र संचालनालयानं देवगड, केओंझार आणि मयूरभंजमध्ये सोन्याचे साठे असल्याचे संकेत दिले आहेत.

या तीन जिल्ह्यांतील ज्या भागात सोन्याचा साठा दर्शविला गेलाय त्यामध्ये दिमिरमुंडा, कुष्कला, गोटीपूर, केओंझार जिल्ह्यातील गोपूर, मयूरभंज जिल्ह्यातील जोशीपूर, देवगड जिल्ह्यातील सुरियागुडा, रुन्सिला, धुशुरा हिल आणि अडास यांचा समावेश आहे. या क्षेत्रातील पहिलं सर्वेक्षण खाण आणि भूविज्ञान संचालनालय आणि GSI यांनी १९७० आणि ८० च्या दशकात केलं होतं. तथापि, त्याचे निकाल सार्वजनिक केले गेले नाहीत.

राज्याचे खाण मंत्री प्रफुल्ल कुमार मलिक म्हणाले की, जीएसआयने गेल्या दोन वर्षांत या तीन जिल्ह्यांमध्ये आणखी एक सर्वेक्षण केलंय. ढेंकनालचे आमदार सुधीर कुमार सामल यांनी विधानसभेत सोन्याच्या साठ्याशी संबंधित प्रश्न विचारला होता. याला उत्तर देताना प्रफुल्ल कुमार यांनी तीन जिल्ह्यांमध्ये ‘खजिना’ मिळण्याची शक्यता सांगितली. मात्र, तीन जिल्ह्यांत सापडलेल्या सोन्याच्या साठ्यात किती सोनं आहे, हे तूर्त स्पष्ट झालेलं नाही.

यापूर्वी, जम्मू आणि काश्मीरमध्ये सापडलेला लिथियमचा साठा ५.९ दशलक्ष टन आहे, जो चिली आणि ऑस्ट्रेलियानंतर जगातील सर्वात मोठा आहे. या शोधानंतर भारत लिथियम क्षमतेच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आलाय. लिथियम हा असा नॉन-फेरस धातू आहे, ज्याचा वापर मोबाईल-लॅपटॉप, इलेक्ट्रिक वाहनांसह अनेक वस्तूंसाठी चार्ज करण्यायोग्य बॅटरी बनवण्यासाठी केला जातो. या दुर्मिळ पृथ्वी घटकासाठी भारत सध्या इतर देशांवर अवलंबून आहे.

जगातील लिथियम साठ्याची स्थिती पाहिली तर या बाबतीत चिली ९.३ दशलक्ष टनांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर ऑस्ट्रेलिया ६३ लाख टनांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. काश्मीरमध्ये ५९ लाख टन साठा मिळाल्यानंतर भारत तिसऱ्या क्रमांकावर आलाय. अर्जेंटिना २७ लाख टन साठ्यासह चौथ्या, चीन २० लाख टन साठ्यासह पाचव्या आणि अमेरिका १० लाख टन साठ्यासह सहाव्या स्थानावर आहे.

हा शोध भारतासाठी खूप महत्वाचा ठरू शकतो. आत्तापर्यंत भारतात आवश्यक असलेल्या लिथियमपैकी ९६ टक्के लिथियम आयात केले जाते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर परकीय चलन खर्च करावे लागते. २०२०-२१ या आर्थिक वर्षात भारताने लिथियम आयन बॅटरीच्या आयातीवर ८,९८४ कोटी रुपये खर्च केले. त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे २०२१-२२ मध्ये, भारताने १३,८३८ कोटी रुपयांच्या लिथियम आयन बॅटरी आयात केल्या.

न्युज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा