CSK vs RCB IPL 2022, 13 एप्रिल 2022: चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मध्ये पहिला विजय नोंदवला आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात चेन्नईने कट्टर प्रतिस्पर्धी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला. सलग चार पराभव स्वीकारल्यानंतर चेन्नईने आयपीएलमध्ये पुनरागमन केले आणि पहिला विजय नोंदवला. चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 23 धावांनी पराभव केला.
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करत 216 धावांचा डोंगर उभा केला. चेन्नईकडून रॉबिन उथप्पाने 88 आणि शिवम दुबेने 95 धावा केल्या. दोघांची अशी तुफान चर्चा झाली की आरसीबीचे गोलंदाज पाणी मागताना दिसले. प्रत्युत्तरात बंगळुरूच्या संघाला सुरुवातीपासूनच हादरे बसू लागले आणि अखेरीस संघ पूर्णपणे गडगडला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा डाव
चेन्नई सुपर किंग्सला गोलंदाजीत चांगली सुरुवात झाली आणि बंगळुरू सुरुवातीपासूनच बॅकफूटवर दिसला.कर्णधार फाफ डू प्लेसिसला केवळ 8 धावा करता आल्या, माजी कर्णधार विराट कोहली पुन्हा अपयशी ठरला आणि मोठा फटका खेळताना सुरुवातीलाच बाद झाला. आरसीबीने 50 धावांच्या आतच चार विकेट गमावल्या होत्या.
मात्र, नंतर सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद यांनी संघाला पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न केला पण त्यांनीही त्यांची विकेट गमावली. पुन्हा एकदा दिनेश कार्तिक सामन्याला स्वबळावर फिरवताना दिसला. दिनेश कार्तिकने 34 धावा केल्या, पण त्यानंतर तो बाद झाला आणि बेंगळुरूचा पराभव निश्चित दिसत होता.
पहिली विकेट – फाफ डु प्लेसिस 8 धावा (14/1)
दुसरी विकेट – विराट कोहली 1 धाव (20/2)
तिसरी विकेट – अनुज रावत 12 धावा (42/3)
चौथी विकेट – ग्लेन मॅक्सवेल 26 धावा (50/4)
पाचवी विकेट – सुयश प्रभुदेसाई 34 धावा (110/5)
सहावी विकेट- शाहबाज अहमद 41 धावा (133/6)
सातवी विकेट- हसरंगा 7 धावा (146/7)
आठवी विकेट – आकाशदीप 0 धावा (146/8)
नववी विकेट- दिनेश कार्तिक 34 धावा (171/9)
चेन्नई सुपर किंग्जचा डाव (216/4)
चेन्नई सुपर किंग्जला या सामन्यातही चांगली सुरुवात करता आली नाही आणि संघाने 36 धावांवर आपल्या दोन विकेट गमावल्या. पण त्यानंतर जे घडलं त्यामुळे सारा खेळच बदलून गेला. रॉबिन उथप्पा, शिवम दुबे यांनी 74 चेंडूत 165 धावांची भागीदारी करत बंगळुरू संघाची अवस्था बिघडवली.
रॉबिन उथप्पाने आपल्या डावात 50 चेंडूत 4 चौकार, 9 षटकारांसह 88 धावा केल्या. दुसरीकडे शिवम दुबेने 95 धावांची खेळी खेळली, ज्यात 5 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता. या स्फोटक खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने 216 धावांची मोठी धावसंख्या उभारली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे