महाराष्ट्रानंतर आत्ता मध्यप्रदेशात सावरकरांवरून वाद, शालेय अभ्यासक्रमावरून काँग्रेस-भाजपमध्ये खडाजंगी

4

पुणे, २९ जून २०२३: महाराष्ट्रात शिंदे सरकारने कालच मुंबईच्या वर्सोवा-वांद्रे सी लिंकचे नाव वीर सावरकर सेतू असे ठेवले, दुसरीकडे मध्य प्रदेशचे शिवराज सरकार नवीन शालेय अभ्यासक्रमात सावरकरांच्या जीवनावरील काही अध्याय जोडणार आहे. या मुद्द्यावरून मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकीय वाद सुरू झालाय.

भारताच्या स्वातंत्र्यात सावरकरांचे भरीव योगदान आहे आणि म्हणूनच त्यांचा आदर केला पाहिजे. दुर्दैवाने काँग्रेस सरकारांनी भारतातील क्रांतिकारकांना इतिहासाच्या पानात स्थान दिले नाही. परकीय आक्रमकांचे वर्णन महान असे केले, १८५७ च्या चळवळीला ‘स्वातंत्र्य संग्राम’ म्हणणारे वीर सावरकर हे पहिले लेखक होते, असे सांगून मध्य प्रदेश सरकारमधील शालेय शिक्षण-स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री इंदरसिंग परमार यांनी काँग्रेसची खिल्ली उडवली.

मध्य प्रदेश काँग्रेसचे आमदार आरिफ मसूद यांनीही प्रत्युत्तर देताना म्हटले की, दुर्दैव आहे की त्यांना सावरकरांचा अभ्यासक्रमात समावेश करायचा आहे. त्यांनी केलेल्या कृत्याबद्दल इंग्रजांची माफी मागितली होती, त्यांचा अभ्यासक्रमात समावेश करणे हा स्वातंत्र्यसैनिकांचा मोठा अपमान आहे. पुढे ते म्हणाले की, एकीकडे ब्रिटिशांपुढे न झुकणारे बिरसा मुंडासारखे महान व्यक्तिमत्त्व आहे आणि दुसरीकडे इंग्रजांची माफी मागणारे सावरकर आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो यात्रेत’ सावरकरांबाबत वादग्रस्त विधान केले होते. सावरकरांच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात आयोजित सभेत भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा