वॉशिंग्टन, ५ जानेवारी २०२३ : जागतिक पातळीवर सध्या आर्थिक स्थिती अत्यंत वाईट सुरू आहे. तिथे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढत आहेत. मेटा, ट्विटरपाठोपाठ आता आणखी एका कंपनीने कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. अॅमेझॉन ई कॉमर्स कंपनी १८ हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याच्या तयारीत आहे. नुकतीच अॅमेझॉनने याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
कंपनीचे सीईओ अँडी जेसी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरमध्ये आम्ही जे जाहीर केले त्यानुसार आमची भूमिका स्पष्ट आहे. जवळपास अठरा हजारहून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत. २०२२ नोव्हेंबरमध्ये अमेझॉनने जवळपास १० हजार कर्मचारी कामावरून काढले होते. दरम्यान, आतार्यंत १५ लाख कर्मचारी अमेझॉनसोबत काम करत होते. त्यापैकी १० हजार कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरमध्ये काढण्यात आले. आता पुन्हा १८ हजार कर्मचाऱ्यांना कमी करण्यात येणार आहे.
पुढे ते म्हणाले की, अनिश्चित अर्थव्यवस्थेमुळे वार्षिक नियोजन अधिक कठीण झाले आहे. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात नोकरभरती केली आहे. अॅमेझॉनमध्ये वेअरहाऊस कर्मचार्यांसह १५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करतात. अॅमेझॉनने आधी १० हजार नोकरकपातीचे लक्ष्य ठेवले होते. नोव्हेंबरपासून ही नोकरकपात सुरु आहे. दरम्यान,अॅमेझॉन इंकने मंगळवारी जाहीर केले की त्यांच्या ई-कॉमर्स कंपनीला ८ अब्ज डॉलर कर्ज पुरवठा करण्यासाठी काही कर्जपुरवठादारांशी करार केला आहे. यातून मिळणारे पैसे कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरले जातील. वाढत्या महागाईमुळे लोकांनी खर्च कमी केला आहे. याचा फटका ॲमेझॉनच्या व्यवसायाला बसला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.