कांदा, कापूस, टोमॅटोनंतर आता दुधाने शेतकऱ्यांना आणले मेटाकुटीला, शेतकऱ्यांनी केले रास्तारोको आंदोलन

औरंगाबाद, १ जून २०२३ : कांदा, कापूस, टोमॅटोचे दर उतरल्यामुळे आधीच शेतकरी हवालदिल झाला असतानाच आता दुधाने देखील शेतकऱ्यांना मेटाकुटीला आणाल्याचे पाहायला मिळत आहे. मागील महिन्यात प्रतिलिटर ३७ रुपये असलेले दुध या महिन्यात थेट ३३ रूपयांवर आले आहे. त्यामुळे प्रतिलिटर दुधात ४ रूपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरल्याचे दिसून येत आहे.

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यातच कांदा, कापूस, टोमॅटो, मिरची सह इतर पिकांचे आणि फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे आधीच शेतकरी वर्ग हवालदिल झाला असतानाच आता दुधाने देखील शेतकऱ्यांना मेटाकुटीला आणाल्याचे दिसून येते आहे. गेल्या महिन्यात प्रतिलिटर ३७ रुपये असलेला दुधाचा दर या महिन्यात थेट ३३ रूपयांवर आला आहे. या घरणीचा थेट परिणाम हा शेतकऱ्यांच्या कौटुंबिक अर्थकारणावर झाला आहे. तर आगामी काळात हे दर आणखी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मागील महिन्यात बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कांद्याला आणि कापसाला भाव मिळत नसल्याने, आक्रमक होत कापूस आणि कांदा रस्त्यावर फेकून देत सरकारचा निषेध नोंदवत आंदोलन केले होते. त्याचबरोबर औरंगाबाद जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आपल्या शेतीतील तीन हजार क्विंटल कांदा जेसीबीच्या साह्याने फेकून दिला होता. अशातच आता शेतकऱ्यांवर दुभत्या जनावरांच्या कडून मिळणाऱ्या उत्पन्नावर संकट ओढावलेले दिसून येत आहे

आधीच शेतीमालाला भाव नसल्याने हवालदिल झालेला शेतकरी दुधाचे दर कमी झाल्याने आणखी आर्थिक अडचणीत सापडला आहे. तर शेतकऱ्यांनी राज्य व केंद्र सरकारच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली आहे.आता दुधाचे भाव घसरल्यामुळे औरंगाबादमध्ये शेतकरी आक्रमक झाला आहेत. येथे करंजगावात रस्ता रोको करण्यात आला असून सरकारचा निषेध व्यक्त केला जात आहे. तर रस्त्यावर दूध ओतून दुधाने अंघोळ करत शेतकऱ्यांनी आंदोलन केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा