पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता अमित शाह पुणे दौऱ्यावर, साखर महासंघाच्या कार्यक्रमाला लावणार हजेरी

पुणे, ३ ऑगस्ट २०२३ : लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागल्याने पुणे शहराकडे गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाने लक्ष केंद्रीत केले आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराच्या पराभवानंतर पक्ष मजबूत करण्यासाठी भाजप कडून तयारी सुरू आहे. निवडणुकीच्या दृष्टीने पुणे जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदार संघाच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवर नेत्यांनीही पुणे शहराला महत्व दिले आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर आता अमित शाह दोन दिवसीय दौऱ्यासाठी पुण्यात येत आहे.

भाजपने मिशन २०२४ ची तयारी सुरु केली आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघातील जबाबदारी वाटली गेली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी मुरलीधर मोहोळ यांना दिली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी राहुल कुल यांच्याकडे दिली गेली आहे. तर शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी महेश लांडगे यांच्याकडे दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विविध विकास कामांचे उद्धाटन केले, त्यात पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन तसेच घरकुल आवास योजनेचे लोकार्पण केले. त्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ५ आणि ६ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात ते साखर महासंघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे. परंतु या दौऱ्यातील बराचसा वेळ अमित शाह यांनी राखीव ठेवला आहे. या दौऱ्यात अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना ते भेटणार आहेत.

निवडणूकीच्या दृष्टीने भाजपने मिशन २०२४ ची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी पुणे जिल्ह्यात भाजप आपला चांगला पाया तयार करण्याचा प्रयत्नात आहे. त्यासाठी आता अजित पवार यांनाही सोबत घेतले आहे. पुणे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. ते मोडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील लोकसभेच्या तिन्ही जागांवर विजय मिळवण्यासाठी अमित शाह हे कार्यकर्त्यांना कानमंत्र देणार का? यावर राजकीय चर्चा सुरु झाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा