कोलकाता ८ फेब्रुवारी २०२५ : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने लागू केलेल्या नियमावली नुसार टीम इंडियाचे सर्व खेळाडू देशांतर्गत सामने खेळण्यासाठी मैदानात उतरले आहेत खर, पण त्यांच्या बॅटमधून चांगली कामगिरि होताना दिसेनासी झाली आहे. कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर मुंबई आणि हरियाणा यांच्यात रणजी ट्रॉफीची उपांत्यपूर्व फेरी खेळली जात आहे. यात मुंबई संघाचा कर्णधार अजिंक्य राहणे यानं प्रथम नणणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण मुंबई संघाचे स्टार फलंदाज लवकर घराकडे माघारी परतले.
टीम इंडियाचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव एकदिवसीय संघातून बाहेर आहे. त्याने २०२३ मध्ये भारतासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. मागच्या काही दिवसांपूर्वी इंगलंड आणि भारत यांच्यात ५ सामन्याची टी-२० मालिका पार पडली. यात सुद्धा सूर्यकुमारला चांगली कामगिरी करता आली नाही. यातच आता सूर्यकुमार मुंबई संघाकडून रणजी ट्रॉफीची उपांत्यपूर्व फेरी खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. पण त्यात सुद्धा तो धावा बनवण्यात अपयशी ठरला. त्याने केवळ ५ चेंडूत ९ धावा केल्या व घराकडे माघारी गेला.
मुंबई संघाची सुरुवात खूप खराब राहिली सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर मुंबईने डावातील पहिली विकेट्स गमावली. आयुष म्हात्रे खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर, दूसरा सलामीवीर आकाश आनंद जास्त काळ क्रीजवर टिकू शकला नाही, त्याने २१ चेंडूत १० धावा काढल्यानंतर आपली विकेट्स गमावली. मुंबई संघाने उपांत्यपूर्व सामन्यात २५ धावांवर आपले पहिले ४ विकेट्स गमावले.
सूर्यकुमारची १० डावांतील खराब कामगिरी :
सूर्यकुमार यादवच्या १० डावांवर फेरनजर टाकली तर, तो सातत्याने अपयशी ठरत आहे. इंग्लंडविरुद्धच्या ५ टी-२० मालिकेतील २ सामन्यात तो शून्य धावांवर बाद झाला होता. गेल्या पाच सामन्यांमध्ये सूर्याने मुंबईसाठी काही खास कामगिरी केलेली नाही. गेल्या वर्षी 21 डिसेंबर रोजी कर्नाटकविरुद्ध 20 धावा केल्यानंतर तो बाद झाला होता. यानंतर, 23 डिसेंबर रोजी, हैदराबादविरुद्ध 18 धावा करून तो बाद झाला. पंजाब आणि पुद्दुचेरीविरुद्ध खातेही उघडू शकले नाही.
सूर्यकुमार यादवने आतापर्यंतच्या कारकिर्दीत ८१ टी-२० आंतराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ३९.३३ च्या सरासरीने २५९६ धावा केल्या आहेत. त्याने त्यात ४ शतके आणि २१ अर्धशतके ठोकली आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रथमेश पाटणकर