पुणे, ५ ऑगस्ट २०२३ : पुणे शहरात दोन दशतवाद्यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. एका मोटारसायकल चोरीच्या प्रकरणात पकडण्यात आलेले ते दोन आरोपी होते. त्यावेळी त्यांचा तिसरा साथीदार फरार झाला. पुणे पोलिसांच्या चौकशीमध्ये ते एनआयएच्या यादीत मोस्ट वॉटेंड असणारे इम्रान खान आणि मोहम्मद युनूस साकी असल्याचे समोर आले. यानंतर या प्रकरणात आणखी तीन जणांना अटक झाली. त्यानंतर इसिस मध्ये तरुणांची भर्ती करणाऱ्या डॉक्टर डॉ.अदनान अली सरकार याला एनआयएने अटक केली. या प्रकारानंतर एनआयएचे महासंचालक पुणे शहरात आले.
पुणे पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर एनआयएचे महासंचालक पुण्यात आले. एनआयएचे महासंचालक दिनकर गुप्ता यांनी पुणे पोलीस आयुक्त रितेशकुमार यांची भेट घेतली. गुप्ता यांनी आयुक्त रितेशकुमार यांच्याकडून या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. तसेच ते दोघे दहशवादी पुणे आणि मुंबई शहरात बॉम्बस्फोट घडवण्याच्या तयारीत असल्याची माहिती तपासातून पुढे आली. यामुळे एनआयएसह देशातील सर्व तपास यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. गुप्ता यांनी यावेळी पुणे पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले. या भेटी दरम्यान राज्यातील एनआयएचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी आणि या दहशतवाद्यांना मदत करणारे इतर दोघे अशा चारही जणांना पुणे जिल्हा न्यायालयाने ११ ऑगस्टपर्यंत कोठडी दिली आहे. या चारही आरोपीकडून अनेक संशयास्पद वस्तू मिळून आल्या असल्याचे एटीएस कडून न्यायालयात सांगण्यात आले.
तसेच हे सगळे इसिसशी संबधित असल्याचे तपासात उघड झाले आहे. या सर्वांना एक दहशवादी संपर्क करत होता. त्याचा शोध घ्यायचा असल्याचे एटीएसने सांगितले. मेल आणि फोनद्वारे तो व्यक्ती या दहशतवाद्यांना सूचना देत होता. या सगळ्यांनी एकत्र येत त्यांच्या घरी अनेक टेस्टिंग देखील केल्या होत्या. या आरोपींचे शिक्षण कमी आहे, परंतु तांत्रिक ज्ञान चांगले होते, त्यांचा अजून तपास करायचा असल्याचे एटीएसने सांगितले. एटीएसचा युक्तीवाद मान्य करत न्यायालयाने त्यांना ११ ऑगस्टपर्यंत कोठडी दिली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर