‘सध्या देश अडाणी राजकारण्यांच्या हातात’ या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता अभिनेत्री काजोलची सारवासारव

मुंबई, १० जुलै २०२३ :देशाचे दुर्दैव आहे की, काही अडाणी राजकारणी सध्या देश चालवत आहेत. हा देश चालवणाऱ्या नेत्यांमध्ये दूरदृष्टी नाही, हे सांगायला काहीच हरकत नाही. या काजोलच्या वक्तव्यामुळे बराच वाद निर्माण झाला होता. या वक्तव्यानंतर काजोल सोशल मीडियावर बरीच ट्रोल झाली. आणि हे ट्रोलिंग वाढतच चाललंय अस दिसल्यावर, अभिनेत्रीने काजोलने स्पष्टीकरण दिलय. काजोल म्हणाली की, माझा देशातील कोणत्याही नेत्याला बदनाम करण्याचा हेतू नाही. उलट असे काही नेते आहेत जे देशाला पुढे नेण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत.

वेब सीरिज ‘द ट्रायलच्या’ प्रमोशनमध्ये काजोल सध्या व्यस्त असुन प्रमोशन दरम्यानच्या एका इव्हेंट वेळी तिने महिला सबलीकरणावर भाष्य केले. यावेळी काजोल म्हणाली की, आजच्या युगात आपण परंपरांत अडकून पडलो आहोत. हे सांगताना दुःख वाटते पण सध्या राज्य करणारे राजकारणी अडाणी आहेत, आणि ही वस्तुस्थिती आहे. कोणताही दृष्टिकोन नसलेले हे लोक आहेत, अडाण्यांपेक्षा सुशिक्षित लोकांचा दृष्टीकोन वेगळा असुन ते इतरांपेक्षा वेगळा विचार करू शकतात. अशिक्षितांचे विचार मर्यादित आहेत. अशा परिस्थितीत आपल्या देशात बदलांचा वेग खूपच स्लो आहे.

या सडेतोड बोलण्यामुळे काजोल सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होतेय. ट्रोलर्सनी सोशल मीडियावर तिखट प्रतिक्रिया देताना लिहिले की, हीचा नवरा एवढा मोठा सेलिब्रिटी असूनही पान मसाल्याची जाहिरात करतो त्यांना अशा गोष्टी शोभत नाहीत. अशा शेकडो ट्विटचा सोशल मीडियावर पाऊस पडतोय. दुसऱ्या एकाने लिहिले की, एकीकडे तंबाखू आणि पान मसाला खाल्ल्याने लाखो करोडो लोकांचा मृत्यू होतोय, तर दुसरीकडे तुमचा नवरा या कम्पन्यांची ऍड करून त्यात भर टाकतो. ट्रोलिंग वाढले तसे काजोलसोबतच लोक अजय देवगणलाही टार्गेट करतायत.

शेवटी वैतागून काजोलला स्पष्टीकरणासाठी ट्विट करावे लागले. काजोलने या ट्विटमध्ये लिहिले- मी फक्त शिक्षणाच्या महत्वावर बोलले, यात कोणाचीही बदनामी करण्याचा माझा हेतू नव्हता. आपल्या देशात असे अनेक दिग्गज नेते आहेत, जे लोकांच्या भल्यासाठी रात्रंदिवस झटतायत. आता काजोलच्या या उलट्या उडी नंतर तरी तिचं ट्रोलिंग थांबतय का? हे पहावे लागेल.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरुराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा