नवी दिल्ली, 12 ऑक्टोंबर 2021: सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यात फोनवर चर्चा झाली. लसीकरण प्रमाणपत्र, अफगाणिस्तानसह विविध मुद्द्यांवर दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली. चर्चेदरम्यान, दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शविली की यूकेने भारतीय लसी प्रमाणपत्रांना मान्यता देणं हे एक स्वागतार्ह पाऊल आहे.
पंतप्रधान मोदी आणि बोरिस जॉन्सन यांनी भारत-यूके अजेंडा 2030 वर चर्चा केली. ग्लासगो येथे आगामी COP-26 च्या संदर्भात हवामान बदलावर विचारांची देवाणघेवाण आणि अफगाणिस्तानसह प्रादेशिक समस्यांवर चर्चा केली. भारत आणि ब्रिटन यांच्यात सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात त्यांच्या प्रवास आणि अलग ठेवण्याच्या नियमांमध्ये बदल झाल्याची घोषणा झाल्यानंतर राजनैतिक वाद निर्माण झाला. ब्रिटनने भारत सोडणाऱ्या नागरिकांसाठी 10 दिवसांचे क्वारंटाईन अनिवार्य केलं होतं. यानंतर संपूर्ण वाद सुरू झाला.
योग्य उत्तर देत भारतानं ब्रिटनमधून देशात येणाऱ्या लोकांसाठी समान नियम लागू केला होता. यानंतर, जॉन्सन सरकारला शेवटी झुकावं लागलं आणि नंतर त्याने प्रवास नियमांमध्ये बदल केले. ब्रिटनला जाणाऱ्या भारतीयांना यापुढं क्वारंटाईनमध्ये राहावं लागणार नाही. या संपूर्ण प्रकरणानंतर, पीएम मोदी आणि बोरिस जॉन्सन यांच्यातील हे पहिलं संभाषण होतं, ज्यामुळं ते खूप महत्वाचं मानलं गेलं.
संभाषणाविषयी माहिती देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याशी बोलणं चांगलं झालं. आम्ही भारत-यूके अजेंडा 2030 वरील प्रगतीचा आढावा घेतला, ग्लासगोमध्ये आगामी सीओपी -26 च्या संदर्भात हवामान कृतीवर विचारांची देवाणघेवाण केली आणि अफगाणिस्तानसह प्रादेशिक समस्यांवरील आमचं मूल्यांकन सामायिक केलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे