पाचगणी अपघातप्रकरणी कारवाईच्या आश्वासनानंतर नागरिकांचे आंदोलन मागे

5

पाचगणी, ६ जून २०२३: पाचगणी-महाबळेश्वर रस्त्यावरील पॉवर हाऊस चौकात मधधूंद अवस्थेतील कार चालकाने दुचाकीला उडवले. यात पाचगणीतील तरुण जागीच ठार झाला होता. या प्रकरणातील संशयित तीन आरोपी पळून गेले होते. तर एकाला स्थानिक नागरिकांनी पकडले होते. या आरोपींना आज पाचगणी पोलिस ठाण्यात हजर केले असता नागरिकांनी मोठी गर्दी करुन आरोपींना ताब्यात देण्याची मागणी केली. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते.

जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह हलवला जाणार नाही, असा हट्ट नातेवाईकांसह स्थानिक नागरिकांनी केला होता. मात्र, पोलिसांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर पोलिस ठाण्याच्या समोरील जमाव मागे हटला. जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख तत्काळ पाचगणी पोलिस ठाण्यात दाखल होत जमावाची समजूत घातली.

या अपघातामध्ये मृत झालेल्या तरुणाचे नाव मोहिनुद्दीन मेहराज शेख (वय ३६ रा. पाचगणी) असे आहे. नातेवाईकांनी मृतदेह पोलिस ठाण्याच्या समोरच ठेवला होता. जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह हलवला जाणार नाही, असा पवित्रा घेतला होता. या अपघातात अविनाश चंद्रकांत गवळी हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वाई येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा