मुंबई, ११ फेब्रुवारी २०२३ : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन एकनाथ शिंदे आणि भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिंदे गटाच्या टार्गेटवर आला आहे. मुंब्रा विकास आघाडी स्थापन करून ‘राष्ट्रवादी’चा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या; तसेच माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा मतदारसंघ असलेल्या कळवा-मुंब्रा मतदारसंघालाच सुरुंग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
हणमंत जगदाळे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे चार नगरसेवक फोडून ठाण्यातही शिंदे गटाने ‘राष्ट्रवादी’ला सुरुंग लावला आहे. गणेश नाईक आणि निरंजन डावखरे हे दोन नेते ‘राष्ट्रवादी’च्या गटबाजीमुळे फार पूर्वीच भाजपमध्ये गेले असल्याने आता सध्या ज्यांच्याकडे राष्ट्रवादीचे नेतृत्व आहे त्या माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांची त्यांच्याच मतदारसंघात कोंडी करून ‘राष्ट्रवादी’च शिंदे गटाच्या टार्गेटवर असल्याचे निश्चित झाले आहे.
माजी नगरसेवक जीतू पाटील यांच्या घरी जाऊन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनधरणी केली होती; परंतु त्यांनी देखील आता शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले आहे. १२ फेब्रुवारीला प्रवेश निश्चित मानला जात होता; मात्र घरगुती कारणास्तव हा प्रवेश लांबणीवर गेला असला, तरी ठाण्यात ‘राष्ट्रवादी’चे आव्हान संपुष्टात आणण्याचे टार्गेटच शिंदे गटाने घेतले की काय? असा प्रश्न या ठिकाणी उपस्थितीत झाला आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर