अकोल्यात हिंसाचारानंतर इंटरनेट सेवा बंद, विद्यापीठाची परीक्षा रद्द, ३० जण ताब्यात

अकोला, १५ मे २०२३ : अकोल्यात इन्स्टाग्राम पोस्टवरून दोन गटात झालेल्या हिंसाचारानंतर शहरात अजूनही तणावपूर्ण शांतता आहे. शनिवारी रात्री झालेल्या हिंसाचार प्रकरणात ३० जणांना अटक करण्यात आली आहे. तर शहरात समाजकंटकांकडून सोशल मीडियातून अफवा पसरू नये म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत.

अकोल्यात शनिवारी रात्री झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी अनेकांची धरपकड केली आहे. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस खबरदारी घेत आहेत. चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हिंसाचारानंतर विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अमरावतीतील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाअंतर्गत होणाऱ्या परीक्षा संचारबंदी असल्याने परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. अकोला शहरात होणाऱ्या ११ केंद्रावरील परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. परीक्षा आता जरी रद्द करण्यात आल्या असल्या तरी विद्यापीठाकडून लवकरच परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी अशी माहिती अमरावती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.

या हिंसाचारामध्ये आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला आहे. तर आठ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन पोलिसांचा समावेश आहे. शहरात तणाव अधिकच वाढत गेल्याने पोलिसांनी अखेर शहरात १४४ कलम लागू करण्यात आले. तसेच नाक्या नाक्यावर आणि संवदेनशील भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा