मुंबई, २५ डिसेंबर २०२२: काल म्हणजेच २४ डिसेंबरला टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने मुंबईत शूटिंगच्या सेटवर वयाच्या २०व्या वर्षी गळफास घेऊन आत्महत्या केली. अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या का केली, हे अद्याप समजू शकलेले नाही; परंतु अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर सहकलाकार शिजान खानवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होत होता. पोलिसांनी कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करून तुनिषा शर्माचा सहकलाकार शिजान खानला अटक केली आहे.
तुनिषा ही कतरिना कैफच्या ‘फितूर’ या चित्रपटात बालपणीची भूमिका साकारत होती. याशिवाय तिने ‘बार बार देखो’, ‘कहानी २’, ‘दबंग ३’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या चालू असलेल्या तिच्या मालिकेमध्ये शिजान हा तुनिषाचा सहकलाकार होता. या दोघांचे प्रेमसंबंध होते. मात्र, त्यांच्या ब्रेकअपने तुनिषा तणावाखाली होती. हेच तिच्या आत्महत्येचे कारण असेल असे बोलले जात आहे. म्हणूनच तुनिषाच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी शिजानला अटक केली आहे. आज वसईच्या कोर्टात शिजान खानला हजर केले जाणार आहे.
तुनिषाने आत्महत्येआधी २४ तासांमध्ये संपर्क साधलेल्या प्रत्येक व्यक्तीचा तपास पोलिसांकडून होत आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट मिळाल्यानंतर आज जे.जे. हॉस्पिटलमधून ११ वाजता तुनिषाचे पार्थिव तिच्या कुटुंबीयांकडे सोपविले जाणार आहे. तर आज ४ ते ४.३० च्या दरम्यान तिच्यावर अंतिम संस्कार होतील. पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करताना दिसत आहेत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे