मुंबई :राज्यसभेसाठीच्या २६ मार्चला होणाऱ्या सात जागांच्या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची यादी नुकतीच जाहीर केली आहे.
राज्यसभेसाठी चर्चेत असलेले राज्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पक्षाने पुन्हा संधी नाकारली. त्यामुळे खडसे यांनी याबाबत पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी खडसे म्हणाले की, ‘राज्यसभेच्या उमेदवारीसाठी माझ्या नावाची चर्चा काही दिवसांपासून होती. मात्र, मलाच तशी अपेक्षा नव्हती. पक्षाला योग्य वाटला, तो निर्णय त्यांनी घेतला. राज्याच्या राजकारणात मला जेवढा रस आहे. तेवढा दिल्लीच्या राजकारणात नाही. त्यामुळे माझ्या नावाची चर्चा असली तरी मला अपेक्षा नव्हती.’
महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या सात जागांसाठी निवडणूक होत आहे. संख्याबळाच्या आधारावर भाजपकडून तीन उमेदवार उतरवण्यात आले आहेत.
त्यापैकी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांना आधीच उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.
तिसऱ्या उमेदवारावर भाजपमध्ये बरीच खलबत सुरू होती. या जागेसाठी एकनाथ खडसे, पुण्याचे भाजपचे नेते संजय काकडे यांच्या नावांची चर्चा होती.परंतु पक्षाकडून पुन्हा एकदा त्यांना डावलण्यात आल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये ऐकायला मिळत होती.













































