बंदच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यात बाजार समित्या, शेतमालाचा लिलाव राहणार बंद

मुंबई, ८ डिसेंबर २०२०: शेतकरी विरोधात पारित केलेल्या कायद्यांवरून देशभरात आज आंदोलन होणार आहे. तसेच शेतकऱ्यांकडून आज भारत बंदची घोषणा देखील करण्यात आली आहे. शेतकरी आंदोलनाचा आज बारावा दिवस असून शेतकरी व सरकार यांच्यामध्ये पाच वेळा चर्चा झाली आहे. मात्र, या चर्चा निष्फळ ठरल्या आहेत. राज्यात देखील आज होणाऱ्या भारत बंदला प्रतिसाद मिळताना दिसतोय. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर आज संपूर्ण राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद राहणार आहेत. यावेळी कांदा, मका, बटाटा आणि इतर शेतमालाचा लिलाव बंद ठेवण्यात येणार आहे. माथाडी कामगारही काम बंद ठेवून या बंदमध्ये सहभागी होणार आहेत.

राज्यात आज होणाऱ्या या बंदला वेगवेगळ्या ठिकाणाहून प्रतिसाद मिळताना दिसतोय. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी कोकणात रिक्षा व टॅक्सी बंद राहणार आहेत. आज बर्‍यापैकी वाहतूक बंद राहिल्याने फळभाज्या, दूध तसेच इतर वस्तूंचा पुरवठा देखील बंद राहणार आहे.

माथाडी नेते नरेंद्र पाटील, आमदार शशिकांत शिंदे, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व सर्व बाजार समितीच्या संचालकांची काल नवी मुंबईत बैठक झाली. या बैठकीत केंद्र सरकारच्या कृषी व पणन कायद्या विरोधात राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारातील तमाम माथाडी कामगार व व्यापाऱ्यांनी होणाऱ्या संपात भाग घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारने आणलेल्या या नवीन कायद्यामुळे केवळ शेतकरी त्रस्त नाहीत तर राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारातील व्यापाऱ्यांचा व्यवसाय आणि कष्टाची कामे करणाऱ्या माथाडी कामगारांची कामे कमी झाल्यामुळे या घटकांवर आणि शेतकऱ्यांवर बेकारीचे संकट ओढविले आहे.

बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या नाशिक, पुणे बाजारपेठ बंद राहणार आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे धान्य, मसाला, फळ, भाजीपाला व कांदा बटाटा मार्केट आज बंद राहणार आहे. बंदमुळे आज लासलगाव मुख्य बाजार आवारावरील कांदा लिलाव बंद राहणार आहे. तसेच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीही बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे फिरकू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा