कोल्हापूर : कोरोनाच्या भीतीनं बऱ्याच अफवांना सध्या लोक बळी पडत आहे. त्यातच आता कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. प्रशासनाने लॉकडाऊन जाहिर केल्यावरही लोक त्याचं किती पालन करतात. त्यावरच कोरोनाची परिस्थिती अवलंबून आहे. मात्र सोशल मिडीया किंवा लोकंकडून मिळणाऱ्या अफवांना एक महिला बळी पडली आहे. कोरोनाच्या धास्तीनं एका वृद्ध महिलेनं आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिये गावात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तीन दिवसांपूर्वी शिये पुलावरून या वृद्ध महिलेने पंचगंगा नदीत उडी घेतली होती. गुरुवारी संध्याकाळी तिचा मृतदेह सापडला.
श्रीमती मालुबाई आकाराम आवळे ( वय ६८, रा. खुशबू इंडस्ट्रीज, एमआयडीसी, शिरोली, मुळ रा. वंदूर ता. कागल ) असे त्यांचे नाव आहे. कोरोनामुळे नव्हे, मात्र कोरोनाच्या धास्तीने जिल्ह्यातील हा पहिला बळी घेतला आहे. कोरोनाच्या भीतीने आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.
गुरुवारी सकाळी त्या अचानक घरातून बाहेर पडल्या. त्यांच्या मुलाने व नातवंडांनी त्यांचा शोध घेतला. काल उशिरा त्यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्या बेपत्ता असल्याची माहिती दिली. दरम्यान नदी पात्रात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.