बारामती, दि. २ ऑगस्ट २०२० : बारामती तालुक्यातील भाजप व रासप यांनी संयुक्तपणे मागील महिन्यात दुधाला १० रुपये अनुदान मिळावे तसेच याची अंमलबजावणी न झाल्यास १ ऑगस्ट पासून राज्यात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, त्यामुळे आता दूध आंदोलन पेटले आहे. दुधाचे दर कमी झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे दुधाला सरकारने १० रुपये अनुदान द्यावे अशी मागणी केली आहे.
शेतकऱ्यांचे दूध सध्या खाजगी दूध डेअरीत १९ रुपयांनी खरेदी केले जात आहे. त्यामुळे दूध दर वाढ होणे आवश्यक आहे. या मागणीसाठी भाजपा व रासपच्या वतीने बारामती शहरातील पेन्सिल चौक व तालुक्यातील काटेवाडी येथे दूध ओतून सरकारविरोधी घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी गावात दि. १ ऑगस्ट रोजी शनिवारी भाजप व रासपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सकाळी गाईची पूजा करुन व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतीमेचे पूजन करून दुधाला १० रुपये अनुदान मिळावे अशी मागणी केली व सरकारचा निषेध करत रस्त्यावर दूध ओतून देण्यात आले.
दुधाच्या अनुदानासाठी सरकारला वेळोवेळी निवेदन देखील देण्यात आले आहे. तसेच पांडुरंगाच्या मूर्तीला दुधाचा अभिषेक घालण्यात आला. सरकार दूधवाढीसाठी ठोस भूमिका घेत नाही, दुधाला दर नसल्याने शेतकऱ्यांना झालेले खर्च देखील वसूल होत नाही. सध्या कोरोना संसर्गामुळे दुभत्या जनावरांना किंमती मिळत नसल्याचे यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी सांगितले तसेच सरकार या विषयावर बोलायला तयार नाही .त्यामुळे आज बारामतीत रस्त्यावर येऊन दुध ओतून आंदोलन करण्याची वेळ आल्याचे आंदोलकांनी सांगितले.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे, शहराध्यक्ष सतीश फाळके, रासपचे ऍड अमोल सातकर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सरकारने लवकरात लवकर दुधाला योग्य भाव वाढवून द्यावा अन्यथा पुढील काळात तीव्र स्वरूपात आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष व भाजपच्या वतीने देण्यात आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी