गोंदिया, १६ सप्टेंबर २०२० : गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना उपचार विभागात, डॉक्टर आणि परिचारिका पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने, याचा ताण स्टॉप नर्सवर येत असून , काल वैद्यकीय महाविद्यालयातील ४८ परिचारीकांनी अधिष्ठात्यांच्या खोलीसमोर काम बंद आंदोलनाला सुरवात केल्यामुळे, कोरोना वॉर्डात उपचार घेत असलेल्या रुग्णांचे हाल होत आहेत.
रुग्णांचे नातेवाईक परिचरिकांच्या अंगावर धावून येतात, तर कधी अंगावर थुंकतात. मात्र तरी देखील जिल्हा शल्य चिकित्सक आणि वैद्यकीय अधिष्ठाता या कडे लक्ष देत नाहीत, तसेच संपूर्ण रुग्णालयात १०० च्या वर परिचरिकांची गरज असताना ४८ परिचारिका कसं काम करणार असा सवाल करत त्यांनी ही आंदोलन छेडलं आहे .
एकीकडे गोंदिया मध्ये वैद्यकिय काम बंद आंदोलन होत असताना मात्र बृहन्मुंबई महानगरपालिका सायन रुग्णालयाच्या गलथान कारभाराविरुद्ध भारतीय जनता पक्षातर्फे काल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वात रुग्णालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलं.
अपघातात जखमी झालेल्या अंकुश सुरवडे या तरूणाचा मृतदेह रुग्णालयानं भलत्याच लोकांच्या ताब्यात दिल्यानं मृतदेहांची अदलाबदल झाली आणि अंकुशच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारही करण्यात आले. सायन रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे युवकाला आपला जीव गमवावा लागला… अंकुश यांच्या कुटुंबियांना सरकारने आर्थिक मदत द्यावी अशी मागणीही भाजपने केली आहे. मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी या संदर्भात आज बैठक बोलावली असून, आम्ही तात्पुरतं आमचं आंदोलन स्थगित करत असल्याचं दरेकर यांनी सांगितलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी