नवी दिल्ली, 17 जून 2022: दोन वर्षांपासून कोरोनामुळं सैन्यात भरती न झाल्यामुळं वयाची मर्यादा ओलांडलेल्या तरुणांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिलाय. अशा तरुणांना आता अग्निपथ योजनेंतर्गत सैन्यात भरती होता येणार आहे. वास्तविक, सरकारने या योजनेतील उमेदवारांची वयोमर्यादा 21 वर्षांवरून 33 वर्षे केलीय. मात्र, सरकारने ही वयोमर्यादा या वर्षासाठीच वाढवलीय. आतापर्यंत सरकारने भरतीचं वय साडे 17 वर्षे ते 21 वर्षे निश्चित केलं होतं. गेल्या दोन वर्षांपासून सैन्यात भरती झाली नसल्याची माहिती आहे. त्यामुळं सरकारने अग्निपथ योजनेंतर्गत सैन्यात भरतीची तयारी करणाऱ्या 23 वर्षे वयाच्या तरुणांना ही संधी दिली आहे.
भरतीसाठी फक्त 12वी पास पात्र असेल
सैन्य भरतीसाठी विहित केलेली शैक्षणिक पात्रता तशीच राहील. 12वी उत्तीर्ण उमेदवार भरतीसाठी पात्र असतील. उमेदवारांची निवड शारीरिक मानक आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणीच्या आधारे केली जाईल, जे अग्निवीर म्हणून 4 वर्षे सैन्यात सेवा करण्यास सक्षम असतील.
40 हजार रुपयांपर्यंत मिळंल पगार
या योजनेंतर्गत दरवर्षी सुमारे 45 हजार तरुणांना सैन्यात भरती करण्यात येणार आहे. ही भरती गुणवत्ता आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे केली जाईल. निवड झालेल्या तरुणांना चार वर्षे सैन्यात सेवेची संधी मिळणार आहे. या चार वर्षांत अग्निवीरांना 6 महिन्यांचं मूलभूत लष्करी प्रशिक्षण दिलं जाणार आहे.
अग्निवीरांना 30 हजार ते 40 हजार महिन्याचे वेतन व इतर सवलती देण्यात येणार आहेत. यादरम्यान अग्निवीरला तिन्ही सेवेतील कायम सैनिकांप्रमाणे पुरस्कार, पदकं आणि विमा संरक्षण मिळंल. 48 लाख रुपयांचं विमा संरक्षण मिळेल.
सेवेदरम्यान शहीद किंवा अपंग झाल्यास 44 लाख रुपयांपर्यंतची भरपाई दिली जाईल. चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर 25 टक्के लोकांना आणखी 15 वर्षे सैन्यात सेवेची संधी मिळंल. चार वर्षांनंतर बाहेर पडणाऱ्या अग्निवीरांना सेवा निधी पॅकेज अंतर्गत सुमारे 12 लाख रुपये एकरकमी करमुक्त मिळतील.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे