एअर फोर्सच्या वेशात ‘हवा’ करणारा तोतया गजाआड! सोशल मीडियावर स्वतःला जवान सांगून फसवणूक

18
एक महिन्यापूर्वी एअर फोर्सचा पूर्ण गणवेश जाळून टाकला होता.

Air Force:सोशल मीडियावर एअर फोर्सच्या जवानाच्या वेशात लढाऊ विमानांसोबतचे फोटो अपलोड करून स्वतःची खोटी ओळख मिरवणाऱ्या एका तोतयाला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गौरवकुमार दिनेशकुमार (वय २५, रा. खराडी) असे या तोतयाचे नाव असून, दक्षिण कमांड मिलिटरी इंटेलिजन्स आणि खराडी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत त्याला अटक केली.

एक महिन्यापूर्वी एअर फोर्सचा पूर्ण गणवेश जाळून टाकला होता.

पहलगाम येथील हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अधिक महत्त्वाची ठरते. गौरवकुमार हा खराडी येथील एका हॉटेलमध्ये काम करत असताना, एअर फोर्सचा गणवेश घालून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर, तो सोशल मीडियावर नागरिकांना खोटी ओळख सांगून त्यांची दिशाभूल करत असल्याची खात्रीलायक माहिती दक्षिण कमांडच्या मिलिटरी इंटेलिजन्सला मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने गौरवकुमारच्या घरी छापा टाकला. झडतीमध्ये पोलिसांना एअर फोर्सचे दोन टी-शर्ट, एक आर्मी कॉम्बॅट पॅन्ट, एअर फोर्सचे बूट, दोन बॅजेस आणि एअर फोर्सच्या ट्रॅक सूटवरील जर्कीन असा गणवेशाशी संबंधित साहित्यसाठा सापडला. त्याने एक महिन्यापूर्वी एअर फोर्सचा पूर्ण गणवेश जाळून टाकल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. त्याच्या मोबाईलमध्ये विविध लढाऊ विमानांसोबत आणि एअर फोर्सच्या ठिकाणांवरील अनेक फोटो आढळून आले आहेत.

पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह छायाचित्रे अपलोड न करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, सोशल मीडियाचा वापर करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. नागरिकांनीही अशा संशयास्पद व्यक्ती आणि पोस्टबाबत सतर्क राहून पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याप्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे