नवी दिल्ली, दि. १९ जुलै २०२०: एअर चीफ मार्शल आरकेएस भदोरिया यांची चीनकडून वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एअरफोर्सच्या वरिष्ठ कमांडरांशी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. दोन दिवसांच्या या महत्त्वपूर्ण बैठकीत वास्तविक नियंत्रण रेषेवरील सद्यस्थितीचा आढावा घेतला जाईल.
राफेल बाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेणार वायुसेना
याशिवाय जुलैअखेरीस ऑपरेशनल स्तरावर राफेल विमान देशात आणण्याच्या प्रक्रियेवरही विचार केला जाईल. भारतीय हवाई दलाचा विचार केला तर आतापर्यंतच्या सर्वात जास्त आधुनिक विमान पैकी राफेल एक आहे. राफेल विमानाचा भारतीय हवाई दलामध्ये समावेश झाल्यास भारताच्या शेजारील दोन्ही देशांच्या तुलनेत भारताकडे एक जमेची बाजू निर्माण होईल. इतकेच नव्हे तर राफेल विमानाच्या भारताच्या हवाई दलामध्ये तैनाती नंतर दक्षिण आशियामध्ये देखील एक वेगळे वातावरण तयार होईल.
सध्या चीन सोबत असलेला तणाव पाहता राफेल भारतीय हवाई दलामध्ये सामील झाल्यास, त्याची तैनाती सुखोई-३० व मिराज २००० या भारतीय दलातील लढाऊ विमान बरोबर भारताच्या उत्तर हवाई सीमेवर तैनात केले जाईल. आत्तापर्यंत भारताकडे जी युद्ध विमाने होती ती सर्व जुन्या तंत्रज्ञानावर आधारित होती. परंतु राफेल पूर्ण नवीन तंत्रज्ञानाशी सज्ज आहे. तसेच याची मारक क्षमता देखील लांब पल्यापर्यंत राहील, त्यामुळे उत्तर सीमेवर राफेल ची तैनाती केल्यास चीन वर व पाकिस्तान वर हवाई दलाचा वचक बसेल.
वायुसेनेच्या या बैठकीत चीनच्या भारत सीमेवरच्या कामांचा आढावा घेतला जाईल. अहवालानुसार दोन दिवसांची ही बैठक २२ जुलैपासून प्रस्तावित आहे. वायुसेनेने सर्व आधुनिक लढाऊ विमाने सीमेच्या अग्रस्थानी तैनात केले आहेत. यामुळे ही लढाऊ विमाने दिवस आणि रात्रीच्या वेळी देखील उड्डाण करू शकतात. लडाख च्या पूर्व भागामध्ये चीनुक हेलिकॉप्टर देखील तैनात करण्यात आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी