नवी दिल्ली, 28 जानेवारी 2022: टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर एअर इंडिया आता अधिकृतपणे टाटा समूहाचा भाग बनली आहे. प्रवाशांसाठी हा क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी आज एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये कॅप्टन तुमचे स्वागत नव्या पद्धतीने करणार आहेत.
‘स्वागत आहे, या ऐतिहासिक उड्डाणामध्ये’
एअर इंडियाने आपल्या क्रू मेंबर्ससाठी नवीन परिपत्रक जारी केलंय. एएनआयने या नोटिशीचा फोटो शेअर केला आहे. त्यानुसार 28 जानेवारी 2022 रोजी एअर इंडियाच्या फ्लाइटमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे अशा प्रकारे स्वागत केले जाईल.
‘प्रिय ग्राहक, मी कॅप्टन, तुमच्याशी बोलत आहे. आजच्या या ऐतिहासिक फ्लाइटमध्ये आपलं स्वागत आहे, कारण आजचा दिवस खूप खास आहे. आज जवळपास 7 दशकांनंतर एअर इंडिया अधिकृतपणे पुन्हा टाटा समूहाचा भाग बनली आहे. एअर इंडियाच्या या फ्लाइटमध्ये आणि प्रत्येक फ्लाइटमध्ये नवीन वचनबद्धतेनं आणि उत्साहानं तुमची सेवा करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. एअर इंडियाच्या भविष्यात आपलं स्वागत आहे. तुमचा प्रवास चांगला जावो अशी आशा आहे. धन्यवाद!’
7 दशकांनंतर टाटांकडे परतली एअर इंडिया
1932 मध्ये जेआरडी टाटा यांनी टाटा एअरलाइन्स नावानं ही विमानसेवा सुरू केली. नंतर त्याचं राष्ट्रीयीकरण झालं. आता जवळपास 7 दशकांनंतर एअर इंडिया पुन्हा टाटा समूहाचा भाग बनली आहे. तोट्यात चाललेल्या एअर इंडियाला खरेदी करण्यासाठी टाटांनी 18,000 कोटी रुपयांची बोली लावली होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे