नवी दिल्ली, ता. १३ डिसेंबर २०२२ : एअर इंडिया ५०० नवीन विमाने खरेदी करण्याच्या तयारीत आहे. लवकरच टाटा समूह ५०० नवीन विमानांची ऑर्डर देणार आहे. यामध्ये ४०० छोटी विमाने आणि १०० मोठ्या विमानांचा समावेश असणार आहे.
मोठ्या विमानांमध्ये एअरबस-३५० एस, बोईंग ७८७२ आणि बोईंग ७७७२ असू शकतात. दरम्यान, या डीलवर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. या ऑर्डरबाबत टाटा समूहाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. जर ही डील निश्चित झाली तर एअर इंडियाच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी खरेदी ठरणार आहे.
टाटांनी २०२२ मध्ये एअर इंडियाचा ताबा घेतला. सरकारी कंपनी एअर इंडिया २७ जानेवारी २०२२ पासून खासगी झाली. यानंतर टाटा देशातील दुसरी सर्वांत मोठी एअरलाईन बनली. टाटा सन्सच्या अध्यक्षांनी एअर इंडियाचे हस्तांतरण करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. २७ जानेवारी २०२२ रोजी निर्गुंतवणूक विभागाच्या सचिवांनी ट्विट केले, की टाटा समूहाने एअर इंडियाचा ताबा घेतला आहे. त्यानंतर एअर इंडियाच्या विस्तारीकरणासाठी टाटा समूहाने योजना आखली असून, त्यामुळे आगामी काळात एअर इंडियाच्या ताफ्यात विमानांची संख्या वाढणार आहे.
१९३२ मध्ये एअर इंडियाची सुरवात
एअर इंडियाच्या इतिहासाबद्दल बोलायचे झाले तर ते एप्रिल १९३२ मध्ये सुरू झाले. त्याची स्थापना उद्योगपती जेआरडी टाटा यांनी केली होती. त्यावेळी नाव टाटा एअरलाइन्स असायचे. जेआरडी टाटांनी वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी छंद म्हणून १९१९ मध्ये पहिल्यांदा विमान उडवले; पण हा छंद जोश बनला आणि जेआरडी टाटा यांनी पायलटचा परवाना घेतला. त्यानंतर एअर इंडियाची सुरवात झाली.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील