अजय देवगणचा चित्रपट प्रेक्षकांसमोर थक्क करणारा क्लायमॅक्स

6

मुंबई , १८ नोव्हेंबर २०२२ : ‘दृश्यम’ हा २०१५ मध्ये प्रदर्शित झालेला अजय देवगणचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला आणि बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेला हा सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांचा विशेष पसंतीस उतरला. “दो अक्तूबर को क्या हुआ था?”, या व अशा अनेक डायलॉग्सवर आजही मीम्स व्हायरल होतात. पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर आता पुन्हा एकदा सस्पेन्स आणि थ्रिलर घेऊन ‘दृश्यम २’ हा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

‘दृश्यम’ आणि ‘दृश्यम २’ हे साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांच्या मल्याळम चित्रपटांचे हिंदी रिमिक्स आहेत; परंतु तरीही हिंदी व्हर्जन तुम्हाला नक्कीच निराश करणार नाही. फॅमिली एंटरटेनमेंटसोबतच त्यातले सस्पेन्स आणि थ्रिलर हे त्या सिनेमाला एक वेगळीच ओळख मिळवून देतात.

‘दृश्यम २’ हा चित्रपट आधीच्या कथेला सात वर्षे पुढे नेतो. केबल ऑपरेटरपासून हा विजय थेट एका थिएटरचा मालक बनला आहे आणि त्याला चित्रपटाचे वेड असून, तो स्वतःच्या एका चित्रपटाची निर्मिती करू इच्छित आहे. तर दुसरीकडे सात वर्षे पूर्ण झाल्यावरही कुटुंबातील मोठी मुलगी (इशिता दत्ता) अंजू हिला पॅनिक ॲटॅक येत असतो, तर पत्नी नंदिनी सतत पोलिसांना घाबरून असते. विजयचे कुटुंब त्या घटनेच्या आठवणीत आणि भीतीत जगत असते. आणि त्यामुळेच एसपी तरुण अहलावत यांची भूमिका साकारत अक्षय खन्नाने चित्रपटात प्रवेश केला आहे. हा तरुण मीरा (तब्बू) यांचा मित्र असतो.

विजय साळगावकरच्या केसला अक्षय खन्ना पुन्हा उघडतो आणि तपास सुरू होतो. पोलिसांना मृतदेह सापडणार का? पोलिस आणि विजय यांच्यामधील लढ्यात कोणाला यश मिळणार, आणि पुन्हा क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनमध्ये फसलेलं विजय साळगावकरचं कुटुंब यातून कसं वाचणार या प्रश्नांची उत्तरं या चित्रपटात प्रेक्षकांना मिळणार आहेत.

अजय देवगण आणि तब्बू यांच्या स्क्रीन केमिस्ट्रीला प्रेक्षकांची दाद मिळते; मात्र ‘दृश्य’च्या तुलनेत ‘दृश्यम २’मध्ये तब्बूचा अभिनय विशेष लक्ष वेधून घेताना दिसत नाही. प्रत्येक सीनमध्ये अक्षय खन्ना भाव खाऊन जातो. अक्षय आणि अजय एकमेकांवर कसे भारी पडतात हा प्रश्न असतानाच दोघांनी आपल्या भूमिकेच्या चौकटीनुसार छाप पाडण्यात यश प्राप्त केलं आहे.

अभिषेक पाठक यांनी प्रामाणिकपणे त्यांची जबाबदारी पूर्ण केली आहे. या चित्रपटातील काही सिन्स आणि डायलॉग्सवर प्रेक्षकांच्या टाळ्या मिळविण्यात आणि सुरवातीची २० मिनिटे थोडी धिम्या गतीने गेली तरी पुढे संपूर्ण चित्रपटाची कथा मनोरंजक बनविण्यात अभिषेक पाठक यशस्वी झाले आहेत. चित्रपटाचा क्लायमॅक्स अक्षरशः थक्क करणारा ठरतो. बॅकग्राऊंड स्कोअरमुळे प्रत्येक सिक्वेन्सवर थ्रिलर निर्माण होतो. सिनेमॅटोग्राफर सुधीर चौधरी यांनी अत्यंत सुंदरपणे या चित्रपटाला एका वेगळ्या नजरेतून दाखवलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा