पुण्याचे पालकमंत्री अजितदादाच ! भाजप कार्यकर्त्यांची कोंडी

पुणे, ४ ऑक्टोबर २०२३ : पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरुन भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात निर्माण झालेल्या वाद सुटला असून, पुण्याच्या पालकमंत्री पदांची माळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गळ्यात पडली. पुण्याचे विदयमान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोलापूर आणि अमरावती या जिल्ह्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

पुण्याचे पालकमंत्री पद सोडण्यास भाजप तयार नव्हते, तर पवार यांनी तो मुद्दा प्रतिष्ठेचा केला होता. त्यामुळे भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी नमते घेत पवारांकडे पुणे जिल्ह्याची सुत्रे सोपवली. त्याचा अप्रत्यक्ष फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होणार आहे, तर पुणे शहरात भाजपची पक्ष म्हणून थोडी पिछेहाट होण्याची शक्यता आहे. सध्या महापालिकेत प्रशासक असल्यामुळे, तेथे पालकमंत्री यांचेच आदेश चालतील. त्याचा फायदा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि आगामी महापालिका निवडणुकीसाठी होणार आहे.

भाजपला पुढील काही काळ शहरात माघार घ्यावी लागणार असल्याचे दिसून येते. दुसऱ्या बाजूला ग्रामीण भागातील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांची कोंडी होणार आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत पवार यांना न दुखावण्याचा निर्णय भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचे जाणवते. त्यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची कोंडी झाली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा