दौंड, १२ मे २०२१: दौंड उपजिल्हा रुग्णालयाच्या विस्तारीत डेडिकेटेड कोविड सेंटरचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल ऑनलाईन पद्धतीने केले. यावेळी त्यांनी एक महत्त्वाची घोषणा देखील केली. लसउत्पादक ‘भारत बायोटेक’च्या प्लॅन्टसाठी पुण्यात तातडीने जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. राज्यात लसींचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर बसत आहे. त्यात सिरम इन्स्टिट्यूटला उत्पादनाबाबत सरकारकडून ऑर्डर न मिळाल्याने लसीचे उत्पादन देखील करण्यात आलेला नाही. अशा परिस्थितीत लसीचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. भारत बायोटेक चा नवीन प्लांट मुळे हा तुटवडा कमी करण्यासाठी थोडाफार तरी हातभार लागणार आहे.
काय म्हणाले अजित पवार
दौंड उपजिल्हा रुग्णालयाच्या विस्तारीत डेडिकेटेड कोविड सेंटरचं उद्घाटन ऑनलाईन पद्धतीनं केलं. यावेळी लसउत्पादक ‘भारत बायोटेक’च्या प्लॅन्टसाठी पुण्यात तातडीनं जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. ते काम तातडीनं मार्गी लागेल, असे यावेळी त्यांनी सांगितले.
कोरोनाला हरवण्यासाठी डॉक्टर, नर्सेससह राज्याची आरोग्य यंत्रणा सर्वशक्तिनिशी लढत आहे. ऑक्सिजन, रेमडेसिवीर औषधांचा सुरळीत पुरवठा व सर्व रुग्णांना आवश्यक उपचार मिळण्यासाठी नियोजन करण्यात आलं आहे. राज्यातील प्रत्येकाला लस देण्याची सरकारची भूमिका आहे. आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे. असेही त्यांनी सांगितले.
दौंड उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीनं देऊळगाव गाडा येथे विस्तारीत डेडिकेटेड कोविड सेंटर सुरु केल्यानं या परिसरातील नागरिकांना चांगल्या दर्जाची आरोग्य सुविधा उपलब्ध झाली आहे. आपण सर्वांनी एकजुटीनं कोरोना संकटाचा सामना करायचा आहे. मार्गदर्शक सूचनांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे