पवारांच्या सभेला उत्तर देण्यासाठी अजित पवारांनी, मुंबईत बीडच्या लोकप्रतिनिधी आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची घेतली बैठक

बीड, २५ ऑगस्ट २०२३ : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अध्यक्ष शरद पवार यांनी बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात सभांचा धडाका लावला आहे. छगन भुजबळांचा येवला, धनंजय मुंडेंच्या बीडनंतर आता पवारांची पुढची सभा ही मुश्रीफांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच कोल्हापूरमध्ये होत आहे. तर आता पवारांच्या सभेला उत्तर देण्यासाठी अजित पवार गट देखील मैदानात उतरणार आहे. बीडच्या सभेत कसे उत्तर द्यायचे याबाबत आज अजित पवारांनी मुंबईत, बीडच्या लोकप्रतिनिधी आणि आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

दरम्यान, यावेळी, बीड जिल्ह्यात येत्या रविवारी होत असलेल्या जाहीर सभेमध्ये कोणत्याही घटकांवर टीका न करता बीड जिल्ह्यातील विकास कामांचा लेखाजोखा मांडण्यात येणार असल्याचे ठरले आहे. याचाच भाग म्हणून आता उपमुख्यमंत्री अजित पवारांची येत्या २७ ऑगस्टला बीडमध्ये सभा होत आहे. या सभेचा टीझर स्वत:धनंजय मुंडेंनी त्यांच्या सोशल मीडियावरुन शेअर केला आहे.

राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी अजित पवारांच्या सभेचा टीझर ट्विट केला आहे. यात त्यांनी जाहीर सभा…! सभा बीड जिल्ह्याच्या विकासाची, अस्मितेची, सन्मानाची अन दुष्काळ मिटवण्याची…! मी येतोय, तुम्ही येताय ना…? अशी टॅगलाईन देत सभेचा टिझर प्रसिध्द केला आहे. पण या टीझरमध्ये शरद पवारांचा फोटो वापरण्यात आलेला नाही तसेच माजलगाव धरणातून परळी औष्णिक विद्युत केंद्रास पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्यासंदर्भात देखील आज कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रालयात बैठक पार पडली.

बीड जिल्ह्यात येत्या रविवारी होत असलेल्या जाहीर सभेमध्ये कोणत्याही घटकांवर टीका न करता बीड जिल्ह्यातील विकास कामांचा लेखाजोखा मांडण्यात येणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे. त्याला अनुसरून मंत्रालयात बीड जिल्ह्यातील विकास कामांच्या संदर्भात विविध बैठकांचे सत्र सुरू आहे. आज अजित पवारांच्या उपस्थितीत ही बैठक झाली आहे. त्यामुळे अजित पवार गटाच्या उत्तर सभेत विकास कामांची मोठ्या प्रमाणात घोषणा होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर अनेक ठिकाणी त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स झळकत आहेत. तर या बॅनर्सवर शरद पवारांचेही फोटो आहेत. यामुळे संतापलेल्या शरद पवारांनी अजित पवारांच्या गटाला परवानगीशिवाय फोटो वापरण्यास मनाई केली आहे. ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केला, ज्यांच्याशी माझे आता वैचारिक मतभेद आहेत त्यांनी यापुढे माझ्या परवानगीनेच माझा फोटा वापरावा. त्या पक्षानेच माझा फोटो वापरावा. अन्य कुणीही माझ्या परवानगीशिवाय फोटो वापरू नये, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले होते. पण आज अजित पवार हे राष्ट्रवादीचे नेते आहेत. राष्ट्रवादीत कोणतीही फूट पडलेली नाही, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं. शरद पवार यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादी एकसंघ असल्याचंच सांगितलं जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे. अजित पवार पुन्हा माघारी येणार? का शरद पवार भाजपाला सपोर्ट करणार? असे प्रश्न महाराष्ट्राला पडले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा