कमळाच्या सावलीतून बालेकिल्ला परत घेण्यासाठी अजित पवारांची नवी खेळी

पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात तब्बल पंधरा वर्षांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा थेट मैदानात उतरले आहेत. एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या शहरावर सध्या कमळाची (भाजप) मजबूत पकड आहे. ही पकड ढिली करण्यासाठी आणि राष्ट्रवादीला पुन्हा एकदा संजीवनी देण्यासाठी अजित पवार यांनी ‘जनसंवाद’ हे प्रभावी शस्त्र हाती घेतले आहे. शनिवार, २० सप्टेंबर रोजी होणाऱ्या या संवादातून ते शहरातील मतदारांशी थेट कनेक्ट साधण्याचा प्रयत्न करणार आहेत.

२०१७ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने १५ वर्षांची सत्ता गमावली आणि भाजपचा झंझावात शहरात सुरू झाला. १२८ पैकी केवळ ३६ नगरसेवक निवडून आल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. एकेकाळी पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांच्या शब्दाला अंतिम मानले जात होते. मात्र, २०१७ नंतर शहराचे राजकारण पूर्णपणे भाजपच्या छायेखाली गेले. आता भाजप स्वबळावर १०० नगरसेवक निवडून आणण्याचा नारा देत असताना, अजित पवारांनी ही नवी चाल खेळली आहे.

सध्या भाजपचे चार आमदार आणि मजबूत संघटना शहरात कार्यरत आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीकडे केवळ अण्णा बनसोडे हे एकमेव आमदार आहेत. संघटनेला बळकटी देण्यासाठी नुकतेच त्यांना उपाध्यक्षपद देण्यात आले, मात्र अजूनही शहराध्यक्ष योगेश बहल यांनी कार्यकारिणी जाहीर केलेली नाही. या पार्श्वभूमीवर, अजित पवारांचा हा ‘जनसंवाद’ कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये पुन्हा विश्वास निर्माण करण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे.

पिंपरी-चिंचवडकरांनी विकासकामे असूनही साथ सोडल्याची खंत त्यांनी अनेकदा व्यक्त केली आहे. आता या संवादाच्या माध्यमातून ते जुने दुवे पुन्हा जोडणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हा जनसंवाद केवळ एक राजकीय सभा नसून, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणाचा पुढील अध्याय लिहिणारा एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. अजित पवारांची ही नवी खेळी राष्ट्रवादीला पुन्हा एकदा गतवैभव मिळवून देईल का, याची उत्सुकता आता सर्वांना लागली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे