गोल पोस्ट इतर राजकारण अजित पवार- शरद पवार भेट कौटुंबिक कारणास्तव, महाविकास आघाडी मजबुतीने उभी- संजय...

अजित पवार- शरद पवार भेट कौटुंबिक कारणास्तव, महाविकास आघाडी मजबुतीने उभी- संजय राऊत

मुंबई, १६ ऑगस्ट २०२३ : अजित पवार सराकरमध्ये गेले. त्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली. अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले. या दोन गटांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळेल, असे राजकीय वर्तुळात बोलले जात होते. मात्र आता या विरूद्ध चित्र दिसत आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्या चार वेळा भेटी झाल्या, भेटी पाहता या दोन्ही गटांमध्ये नक्की काय सुरु आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या सगळ्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वक्तव्य केले आहे.

१२ ऑगस्टला चांदणी चौक पुलाच्या उद्घाटनानंतर पुण्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्यात भेट झाली. उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या घरी ही भेट झाली. ही कौटुंबिक आणि वैयक्तिक भेट असल्याचे अजित पवार आणि शरद पवार या दोघांनीही सांगितले. मात्र या भेटीनंतर महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत प्रश्न विचारले जाऊ लागलेत. त्यावर संजय राऊत यांनी भूमिका मांडली.

काही कौटुंबिक अडचणी आणि कौटुंबिक कामासाठी अजित पवार आणि शरद पवार भेटले अशी माझी माहिती आहे. पवारांचे कुटुंब मोठे आहे. यावर मी अधिक बोलायला नको. पण याचा राजकारणावरती आम्ही कोणताही परिणाम होऊ देणार नाही. महाविकास आघाडी मजबुतीने उभी आहे. महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आहेत आणि राहतील. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस राहील आणि इंडिया आघाडीमध्ये देखील राहील. आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र राहणार आहोत, असे संजय राऊत म्हणाले.

शरद पवार हे महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते आहेत. आमचे मार्गदर्शक आहेत, आमचे नेते आहेत. काल रात्री त्यांची आणि माझी फोनवरून चर्चा झाली. शरद पवार सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ते सोलापुरात होते तिथे त्यांचे स्वागत झाले. आज ते संभाजीनगरमध्ये पक्ष बांधणीसाठी आहेत, असेही राऊतांनी सांगितले आहे.

पंतप्रधान मोदी यांच्याशी आमचे काही वैयक्तिक वैर नाही. पण ते ज्या प्रकारे बिनबुडाचे, बदल्याचे राजकारण करत आहेत.त्यामुळे विरोधकांना एकत्र यावे लागले आहे. २०२४ च्या निवडणुका आम्ही जिंकू. इंडिया आघाडीचे सरकार येईल. पुढचा स्वातंत्र्य दिनाचा लाल किल्ल्यावरचा सोहळा नरेंद्र मोदीजी गुजरात मध्ये आपल्या घरी बसून पाहतील किंवा माजी पंतप्रधान म्हणून समोर बसून पाहतील. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

error: Content is protected !!
Exit mobile version