अजित पवार पुन्हा गोत्यात, सिंचन घोटाळ्याची होणार चौकशी

मुंबई, १७ ऑक्टोबर २०२०: सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडी मार्फत आता सिंचन घोटाळ्याची चौकशी होणार असल्याचं वृत्तं आहे. त्यामुळे या घोटाळ्याप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार हे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार यांचं नाव सातत्याने चर्चेत होतं. याबाबत तपास देखील सुरू करण्यात आला होता.

पण, आता सध्या राज्यात आघाडी सरकार आहे. त्यामुळे अजित पवार यांच्याभोवती सिंचन घोटाळ्याचे वादळ फिरणं थांबलं आहे. सत्तेसाठी नेत्यांकडून असे डावपेच नेहमी सुरू असतात. याचे उदाहरण म्हणजे सध्या भाजप सरकार सत्तेत नाही. त्यामुळे जलयुक्त शिवाराच्या कामाची चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणले जात आहे. अर्थात याबाबत सूचना देखील देण्यात आल्या आहेत. परंतु भाजपचे सरकार असताना अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळा प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली होती.

सिंचन घोटाळ्याची चौकशी सुरू असताना अजित पवार यांनी २०१९ च्या निवडणुकीत एक वेगळीच खेळी खेळत आपल्यावरील हे आरोप पुसण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत घडलेल्या सत्तानाट्यावेळी अजित पवार यांनी सर्वांनाच धक्का देत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथविधी उरकला होता. यानंतर लगेचच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून न्यायालयात अजित पवार यांना क्लीनचिट देण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले होते.

परंतु क्लीनचिट मिळाल्यानंतर अजित पवार यांनी फडणवीस यांचा हात झटकात पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. भाजपच्या हातात आलेली सत्ता अजित पवारांच्या घुमजावमुळे पुन्हा निसटली. मात्र यानंतर अजित पवार यांनी फडणवीस सरकारला तोंडघशी पाडल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडूनही घुमजाव करण्यात आले होते. एसीबीचे तत्कालीन महासंचालक परमबीर सिंह यांनी नजरचुकीने अजित पवारांना क्लीनचिट दिल्याचे न्यायालयाला सांगितले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा