इस्लामपूर, ९ सप्टेंबर २०२३ : राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी पक्षाचे बंडखोर नेते अजित पवार रविवारी वाळवा तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या गावी कासेगाव येथे व पेठनाका येथे भाजपतर्फे त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. कासेगावात त्यांची जाहीर सभाही होणार आहे.
राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर उपमुख्यमंत्री पवार हे पहिल्यांदाच तालुक्यात येत असल्याने ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर काय निशाणा साधणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. रविवारी दुपारी दीड वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कासेगाव येथे आगमन होणार आहे. येथे त्यांचे जिल्हा भाजपच्यावतीने स्वागत करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी सांगितले. येथे पवार यांची जाहीर सभाही होणार आहे.
त्यानंतर पेठनाका येथे महाडीक शिक्षण संकुलला उपमुख्यमंत्री अजित पवार भेट देणार आहेत. स्व.नानासाहेब महाडिक यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ते तेथे भोजनासाठी थांबणार आहेत. यावेळी भाजपचे नेते राहुल महाडिक व सम्राट महाडिक यांच्यावतीने त्यांच्या नागरी सत्कार करण्यात येणार आहे. येथे त्यांची पत्रकार बैठक होणार आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर