मुंबई, ४ सप्टेंबर २०२३ : सार्वजनिक साहित्याची नासधूस हे आपल्या राज्यांचे नुकसान आहे. जाळपोळ, नासधूस करण्याव्यतिरिक्त शांततेच्या मार्गाने देखील आंदोलन करण्यात येते. त्यामुळे राज्यातील सर्व मराठा संघटनांना आरक्षणासाठी हिंसेच्या अवलंब करु नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. मराठा आरक्षणाबाबत आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जेव्हा राज्यात अशा घटना घडतात, तेव्हा याचे राजकारण केले जाते हे दुर्दैवी आहे. मराठा आरक्षणाला गालबोट लावण्याचा काहींचा प्रयत्न असुन मराठा आरक्षणाबाबत समाजात गैरसमज पसरवले जात आहेत. काही जणांकडून मंत्रालयातून लाठीमारचे आदेश आले असा आरोप केला जातोय, तर त्यांनी हे सिद्ध करुन दाखवावे असे आव्हान देखील अजित पवार यांनी विरोधी पक्षांना केले आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या कोर्टात आहे. देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पहिल्यापासूनच आग्रही आहेत. मराठा आरक्षण टिकवण्यासाठी स्वतः फडणवीसांचे प्रयत्न आहेत. सरकार मराठा आरक्षणासंदर्भात गंभीर आहे. आज झालेल्या बैठकीतही सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे आरक्षणासाठी हिंसेच्या मार्गाचा अवलंब करु नका तर शांतता राखा, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर