अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी आज ना उद्या मिळेल, प्रफुल्ल पटेल यांचे वक्तव्य

नागपूर, २७ जुलै २०२३ : अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर लवकरच अजितदादांना मुख्यमंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चांनीही जोर धरला आहे. अजित पवारांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला होता. तर राष्ट्रवादीचे मंत्री आणि आमदारांनीही अजित पवार हे भविष्यातील मुख्यमंत्री असल्याची विधान केली आहेत. त्यामुळे अजित पवार मुख्यमंत्री होण्याच्या चर्चांनी अधिकच जोर धरला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्रीपदाबाबतच्या चर्चांवर अजित पवार यांनी काहीच भाष्य केलेले नाही. त्यामुळे त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचं गूढ अधिकच वाढले आहे. त्यातच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत विधान केले आहे.

प्रफुल्ल पटेल माध्यमांशी संवाद साधत होते. आज ती जागा रिकामी नाही. मग चर्चा कशाला करता? अजितदादा महाराष्ट्रातील वजनदार व लोकप्रिय नेते आहेत. आमच्या पक्षाचे नेतृत्व करत आहेत. काम करणाऱ्यांना आज ना उद्या, उद्या ना परवा, कधी ना कधी संधी मिळतच असते. अनेक लोकांना संधी मिळाली तशीच अजित पवार यांना आज ना उद्या संधी मिळेलच. आम्हीही त्या दिशेने काम करत आहोत, असे सूचक विधान प्रफुल्ल पटेल यांनी केले. त्यामुळे अजित पवार मुख्यमंत्री होण्याच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसरी टर्म मिळावी म्हणून तुम्ही प्रयत्न करत आहात का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर ते म्हणाले आमचा पक्ष काही दिवसांपूर्वी एनडीएमध्ये सहभागी झाला आहे. त्यामुळे आम्ही सगळे ताकदीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसरी टर्म मिळवण्यासाठी लढणार आहोत, असे पटेल यांनी सांगितलं. भारत जीडीपी बाबत दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आलेला आहे. येणाऱ्या पाच वर्षात नक्कीच विश्वासाने तिसऱ्या क्रमांकावर येऊ शकतो आणि त्यासाठी एक स्थिर चांगले, विकासशील सरकारची गरज आहे. कालपर्यंत आम्ही होतो म्हणून काही टीका करायचे कारण नाही. पण जे काही आपल्याला दिसत आहे, ते म्हणजे वेगवेगळे पक्ष, वेगवेगळे विचारधारा आणि एवढ्या साऱ्या लोकांना एकत्र आणणे ही काही सोपी गोष्ट नाही असेही त्यांनी सांगितले.

एक चांगले स्थिर सरकार आणि या सरकारला चेहरा असला पाहिजे. त्या चेहऱ्यावर लोकांचा विश्वास असला पाहिजे, ही आजची काळाची गरज आहे. म्हणून आम्ही पण निर्णय घेतला, अनेक बाबींचा विचार करून निर्णय केला. मागच्या काही दिवसांमध्ये आज जे इंडिया म्हणतात त्यांच्या मीटिंगमध्ये मला जाण्याचा एकदा प्रसंग आला. त्यावेळी अनेक पक्षाचे आणि वेगवेगळ्या विचाराचे लोक एकत्र आले होते. पण त्यांच्यात विश्वासार्हता प्रस्थापित होऊ शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.

लोकसभेत सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यावर ते म्हणाले, हे जे सगळे काही चालले आहे ते काही नाही. ३० वर्ष संसदेत अविश्वास प्रस्ताव आलेले आहेत. नो कॉन्फिडन्स मोशन कितपत यशस्वी होतात हे सगळ्यांना माहिती आहे. लोकसभेच्या सदस्यांच्या आकड्याच्या आधारावर कुठल्याही परिस्थितीत अविश्वास मत ठराव पारित होऊ शकत नाही. कारण भाजपचे स्वतःचे ३०० च्या वर सदस्य आहेत. अविश्वास प्रस्ताव आणणे म्हणजे लोकांच्या डोळ्यात धुळ फेकणे आहे. त्याला काही अर्थ नाही हे सगळ्यांना माहिती आहे. विरोधकांनाही माहिती आहे की त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही, असेही प्रफुल्ल पटेल यावेळी म्हणाले.

न्युज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा