मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार हेच उपमुख्यमंत्री होणार असल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादीत अजित पवारांच्या नावावर एकमत झाल्याची माहिती मिळत आहे.
अजित पवारांना मंत्रिमंडळात स्थान देण्याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील सकारात्मक असल्याचे वृत्त आहे. या बातमीला राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी देखील अप्रत्यक्षपणे दुजोरा दिला आहे.
शरद पवार यांनी यासाठी राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांशीही चर्चा केल्याची माहिती मिळते आहे. पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, कोकण, विदर्भ, मराठवाडा अशा सर्व भागांतील नेत्यांची मते विचारात घेण्यात आली आहेत.
प्रशासनावरची अजित पवार यांची घट्ट पकड दिसून येत असल्यामुळेच त्यांच्या नावाला सर्वांकडून सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवाजी पार्कवर राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरही जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात उपमुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेचसमोर आली होती. त्यामुळे अजित पवार हे लवकरच पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना दिसण्याची शक्यता आहे.