दसरा मेळाव्या आधीच अजित पवारांचा दोन्ही गटाला सल्ला

पुणे, ५ ऑक्टोंबर २०२२ : आज राज्यात दसऱ्याच्या निमित्ताने एकमेकांना शुभेच्छा देण्या सोबतच मुंबईत दोन मैदानावर धडाडणार्‍या दोन तोफांच्या जोरदार चर्चा रंगत आहेत. दसऱ्याच्या निमित्ताने शिवसेनेच्या दोन्ही गटाचा मुंबईत मेळावा पार पडणार आहे. तर या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवारांनी दोन्ही गटाला सल्ला दिला आहे. पुण्यातील काही दुकानांचे उद्घाटनासाठी ते आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच दिवशी दोन दसरा मेळावे होणार आहेत. एकीकडे शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भाषण तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बीकेसी मैदानावर दसरा मेळावा पार पडणार असून यासाठी राज्यभरातील शिवसैनिकांनी हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आले असून दोन्ही मेळावे एकाच वेळी होणार असल्याची चर्चा आहे. तर यावेळी दोन गटात कटूता वाढू नये यासाठी काळजी घेण्याचे आवाहन अजित पवारांनी केलं आहे.

पुण्यातील काही दुकानांच्या उद्घाटनासाठी अजित पवार आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना बोलतात की दसऱ्याच्या दिवशी त्या दोघांनी समंजस भूमिका घ्यावी. जरूर त्यांनी आपापली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आपल्या पक्षाची भूमिका जनतेसमोर ठेवण्याचा अधिकार आहे. पण कुणाच्याहीबद्दल अनादराची भावना न दाखवता जी महाराष्ट्राची परंपरा आहे, तिला कुठेही बाधा लागणार नाही, डाग लागणार नाही, कमीपणा येणार नाही, कटुता वाढणार नाही अशा प्रकारे प्रत्येकाने राहिले पाहिजे असं आवाहन मी करेल असं अजित पवार यावेळी म्हणाले.

तसेच आता वाद इतके पराकोटीला गेले आहेत. त्यात कुणी पुढाकार घ्यायचा, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. शब्दानं शब्द वाढत जातो. एकानं आरे म्हटल्यावर पुढच्यानं कारे म्हणायचं. त्यातून ते इतकं खालपर्यंत जातं, की खालच्याही लोकांना वाटतं की आपण एकमेकांचे शत्रू झालो. असं नाहीये. तेवढ्यापुरतं आपापल्या भूमिका सांगण्याचं काम प्रत्येकानं करायला पाहिजे. पण एकदा राजकीय जोडे बाजूला ठेवले की सगळ्यांनी एकमेकांना सलोख्याच्या भावनेतून पाहावं तसेच कुठलीही गोष्ट फार काळ टोकाची राहात नाही असाही सल्ला अजित पवारांनी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना दिला आहे.

आज एकाच वेळी मुंबईत दोन ठिकाणी इतके मोठे सोहळे होत असल्यामुळे प्रशासनावरही व्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त ताण येणार आहे, तर या पार्श्वभूमीवर राजकीय पातळीवर दोन्ही नेते जनतेला काय संबोधनार आहेत, तसेच दोन्ही गटात काय आरोप प्रत्यारोप होतील याकडे आता सर्वांचं लक्ष लागणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा