गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे शिंदे-फडणवीसांच्या दौऱ्या आधीच अजित पवारांची प्रतिक्रिया!

शिंदे-फडणवीसांच्या दौऱ्या आधीच अजित पवारांची प्रतिक्रिया!

पुणे, २६ ऑक्टोंबर २०२२ : राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे राज्याचा दौरा करणार आहे. उद्धव ठाकरेंचा दौरा जाहीर झाल्यानंतर शिंदे-फडणवीसांनी एकत्रित दौरा आयोजित केला आहे. महत्त्वाचे म्हणजे उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी शिंदे-फडणवीसांच्या दौऱ्याला सुरूवात होणार आहे. या संदर्भात खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही त्या गोष्टीला दुजोरा दिला आहे. दरम्यान शिंदे फडणविस दौऱ्याआधी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

बारामतीमध्ये पवारांच्या घरी आज दिवाळीनिमित्त भेट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पवार कुटुंबीयांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह सामान्य नागरिकांच्याही भेटी घेतल्या. त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवारांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर टीकास्र सोडलं.

काय म्हणाले अजित पवार

अजित पवारांनी यावेळी बोलताना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना आधीच भेटल्याचा संदर्भ दिला. आता पार दुष्काळाचं वाटोळं झालं आहे. ओल्या दुष्काळाबाबत मी स्वत: दिवाळीच्या आधी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटलो होतो. तेव्हाच मी म्हणालो होतो की परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. एकतर सगळ्यांची खरीपाची पिकं गेली. रब्बीचीही पिकं गेली. शेतकऱ्याला आता काय करावं आणि काय करू नये हे सुचत नाहीये. तो इतका चिंतेत आहे की विचारता सोय नाही, असं अजित पवार म्हणाले.

तसेच आज सण आहे, आज कुणावर टीका करून सणाच्या उत्साहावर विरजण घालण्याचं काम मला करायचं नाही. आजचा सण संपू द्या. उद्या त्यावर माझी किंवा पक्षाची भूमिका मांडण्याचं काम आम्ही करू असं अजित पवारांनी यावेळी सांगितले आहे.

शिंदे -फडणविस दौरा

राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या भेटीला उद्धव ठाकरे गेले होते. उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर टीका देखील झाली. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा सुरू होण्याआधीच शिंदे फडणवीस महाराष्ट्र दौरा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. ठाकरे गटाचे बालेकिल्ले असलेल्या भागात शिंदे फडणवीस एकत्रित दौरा करणार आहेत तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे दौरे महत्त्वाचे ठरणार आहेत.

न्यूज प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

error: Content is protected !!
Exit mobile version