कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी

पुणे, १२ सप्टेंबर २०२० : पुण्यातल्या वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे संपर्कमंत्री अजित पवार यांनी, काल प्रशासकीय अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. 
                                                                                                                                सध्याच्या कोरोनाच्या काळात पुणे आणि परिसरातील  साथ कमी कशी होईल यादृष्टीनं निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी करण्याऐवजी, काही अधिकारी केवळ नियमांवर बोट ठेऊन कामकाजात अडथळे निर्माण करत आहेत असं सांगून, यापुढे कामातली कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नसल्याचा, सज्जड दम देखील, पवार यांनी दिला.
 
कोणत्याही परिस्थितीत पुण्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आलाच पाहिजे, त्यासाठी सर्व आवश्यक प्रयत्न करा , निधी कमी पडू दिला जाणार नाही पण त्याचे ठोस परिणाम दिसलेच पाहिजेत अशा शब्दात, पवार यांनी अधिकाऱ्यांना सुनावलं. पुण्यातल्या कोरोना परिस्थितीबाबत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
 
याच बैठकीत ससून रुग्णालयात रुग्णांना उपचार मिळत नसल्याचा मुद्दा, महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी उपस्थित केला. त्यावेळी;  येत्या ८ दिवसांत ससून रुग्णालय पूर्ण क्षमतेनं सुरू होणार असल्याचं, अजित पवार यांनी सांगितलं. ससून रूग्णालयात काही तांत्रिक अडचणी आल्यानं रूग्ण दाखल करुन घेतले जात नाहीत. परंतु,आठ दिवसात या अडचणी सुटतील आणि पुर्ववत पूर्ण क्षमतेनं ससून सुरू होईल, असं पवार म्हणाले.
 
 
न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा