नवी दिल्ली , 24 जून 2022: Tata Advanced Systems आणि L&T ने भारतीय हवाई दलाच्या आकाश एअरफोर्स लाँचरसाठी 100 वे लाँचर बनवलं आहे. याआधी टाटाने भारतीय लष्कराला 49 आकाश लाँचर दिले आहेत. अगदी अलीकडं, राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील पोखरण फील्ड फायरिंग रेंजवर आकाश मिसाईलच्या प्रगत आवृत्तीची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
आकाश मिसाईल हे भारताच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या सर्वात धोकादायक मिसाईलपैकी एक आहे. हे मिसाईल भारतीय लष्कराने हवाई सुरक्षेसाठी तयार केलं आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात देखील या मिसाईलची ओडिशातील चांदीपूर येथील इंटीग्रेटेड टेस्ट रेंज वरून यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर मानवरहित हवाई लक्ष्याचा मागोवा घेत ते हवेत नष्ट केलं. आकाश प्राइमची नवीन आवृत्ती म्हणजेच आकाश शत्रूचा काळ कसा बनेल ते समजून घेऊया.
आकाश प्राइम मिसाईलमध्ये स्वदेशी सक्रिय आरएफ सीकर बसवलेले आहे, जे शत्रूचे लक्ष्य ओळखण्याची अचूकता वाढवते. याशिवाय अतिउंचीवर गेल्यावर तापमान नियंत्रण यंत्र अपग्रेड करण्यात आले आहे. ग्राउंड सिस्टम अपग्रेड करण्यात आली आहे. याशिवाय, रडार, ईओटीएस आणि टेलिमेट्री स्टेशन, मिसाईल ट्रेजेक्टरी आणि फ्लाइट पॅरामीटर्समध्ये सुधारणा करण्यात आलीय. मात्र यापेक्षा जास्त माहिती लष्कर, सरकार किंवा डीआरडीओकडून अद्याप देण्यात आलेली नाही.
यापूर्वी गेल्या वर्षी जुलैमध्ये आकाश-एनजी म्हणजेच आकाश न्यू जनरेशन क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. आकाश-एनजी हे जमिनीवरून हवेत मारा करणारे मिसाईल आहे. हे भारतीय हवाई दलासाठी बनवण्यात आलं आहे. आकाश-एनजी म्हणजेच आकाश न्यू जनरेशनमध्ये ड्युअल पल्स सॉलिड रॉकेट मोटर आहे, ज्यामुळं त्याचा वेग वाढतो. त्याची रेंज 40 ते 80 किलोमीटर आहे. तसेच, यात सक्रिय इलेक्ट्रॉनिकली स्कॅन केलेले अॅरे मल्टी फंक्शन रडार (MFR) आहे जे एकाच वेळी अनेक शत्रूची मिसाईल किंवा विमानं स्कॅन करू शकतात.
आकाश-एनजी मिसाईल मोबाईल प्लॅटफॉर्मवरून सोडले जाऊ शकते. आकाश-एनजीचे एकूण वजन 720 किलो आहे. त्याची लांबी 19 फूट आणि व्यास 1.16 फूट आहे. हे 60 किलो वजनाचे शस्त्र वाहून नेऊ शकते.
सध्या, भारतात तीन प्रकार उपलब्ध आहेत – पहिला आकाश MK – त्याची श्रेणी 30KM आहे. दुसरा आकाश Mk.2 – त्याची रेंज 40KM आहे. तिसरा आकाश-एनजी – याची रेंज 80KM आहे. आकाश-एनजी मिसाईल 20 किमी उंचीवरून शत्रूच्या विमानांना किंवा मिसाईल नष्ट करू शकते. सर्वात धोकादायक म्हणजे त्याचा वेग. त्यामुळे शत्रूला पळून जाण्याची तयारी करण्याची संधी मिळत नाही. त्याचा वेग 2.5 Mach म्हणजेच 3087 किलोमीटर प्रति तास आहे. म्हणजेच ते एका सेकंदात सुमारे एक किलोमीटर अंतर कापते.
आकाश-एनजी मिसाईलच्या जुन्या आवृत्त्या 2009 पासून भारतीय सैन्याला सेवा देत आहेत. आकाश-एनजी मिसाईल T-72 किंवा BMP चेसिस किंवा टाटा मोटर्सच्या हेवी मोबिलिटी ट्रकवर बनवलेल्या मोबाइल लॉन्च सिस्टमवरून डागता येते. या मिसाईलच्या मोबाईल प्रक्षेपण प्रणालीसाठीची वाहने टाटा मोटर्स आणि बीईएमएल-टाट्रा यांनी तयार केली आहेत.
आकाश-एनजी क्षेपणास्त्राची जुनी आवृत्ती लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) गेल्या वर्षी चीनसोबतच्या सीमा विवादादरम्यान तैनात करण्यात आली होती. याशिवाय भारतीय हवाई दलाने ग्वाल्हेर, जलपाईगुडी, तेजपूर, जोरहाट आणि पुणे तळांवर आकाश क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. (फोटोः DRDO)
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे