पुणे : मागील आठवड्या (दि.१४) रोजी पुण्यामधील पाषाण तलावाजवळ पहाटेच्या सुमारास दोन दिवसांच्या जुळ्या बाळांना आई-वडील बेवारस टाकून फरार झाले होते.
या बाळाच्या रडण्याच्या आवाज ऐकून फिरायल्या आलेल्या लोकांनी आणि सुरक्षा रक्षकांनी त्यांचा शोध घेतला असता ती जुळी बाळं आढळली होती. यानंतर त्या बाळांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून पोलीस या बाळांच्या पालकांचा शोध घेत होते. अखेर आठ दिवसांनी चतु:श्रुंगी पोलिसांनी जुळ्यांच्या पालकांना शोधून काढण्यात यश मिळवले आहे. प्रेमप्रकरणातून या बाळांचा जन्म झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धायरी परिसरात संबंधित आई-वडील लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहतात. संबंधित महिला विधवा असून याआधीच तिला तीन मुलीही आहेत. लिव्ह इनमध्ये असताना गर्भवती राहिलेल्या महिलेने बाळांच्या जन्मानंतर त्यांना तलावाजवळ सोडून दिले होते. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यात यश आले आहे. त्या जुळ्या मुलांच्या आई-वडिलांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी शहरातील कोणत्या रुग्णालयात या जुळ्यांचा जन्म झाला आहे का याचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी वारजे रुग्णालयात गेल्या काही दिवसांपूर्वी जुळ्या मुलांचा जन्म झाल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा पत्ता मिळून शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून एक धक्कादायक सत्य समोर आले. त्यात आरोपी महिला विधवा असून ती एका रिक्षाचालकासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहते. दोघांनाही बाळांना सांभाळायचे नव्हते. त्यामुळे त्यांनी जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी पाषाण तलावाजवळ सोडून दिल्याचे उघड झाले.