अखिलेश यादव बनले समाजवादी पक्षाचे तिसऱ्यांदा अध्यक्ष

उत्तर प्रदेश, २९ सप्टेंबर २०२२ : समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची सलग तिसऱ्यांदा पक्षाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक अधिकारी राष्ट्रीय मुख्य सरचिटणीस प्रा. राम गोपाल यादव यांनी अखिलेश यादव यांच्या निवडीची घोषणा करत पक्षश्रेष्ठींनी त्यांचे अभिनंदन करून पक्षासाठी लढत राहण्याची ग्वाही दिली आहे.

अखिलेश यादव यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होण्याची ही सलग तिसरी वेळ आहे. सर्वप्रथम १ जानेवारी २०१४ रोजी त्यांना पहिल्यांदाच मुलायमसिंह यादव यांच्या जागी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यात आले होते. त्यानंतर ऑक्टोबर २०१७ मध्ये आग्रा येथे झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात त्यांची पुन्हा एकदा पक्षाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली होती. अखिलेश यादव यांच्या आधी त्यांचे वडील मुलायम सिंह यादव हे पक्षाच्या स्थापनेपासून अध्यक्ष होते. ऑक्टोबर १९९२ मध्ये समाजवादी पक्षाची स्थापना झाली. तेव्हापासून आज पर्यंत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद यादव कुटुंबाकडेच आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुका आणि २०२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या सलग निवडणूक पराभवानंतर हे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित केले आहे. राज्यातील प्रत्येक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची जोरदार तयारी पाहता अखिलेश यांच्यासमोरची आव्हाने आता पूर्वीपेक्षा मोठी असणार आहेत.

आगामी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत आणि त्यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करण्याचे आव्हान अखिलेश यादव यांच्या पुढे आहे. अशा स्थितीत पक्ष नेतृत्वाला भूतकाळातील चुकांमधून धडा घेऊन संघटन पुन्हा जोमाने उभारावे लागणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा