बुलढाणा १९ मार्च २०२४ : बुलढाणा जिल्ह्यातील जळगांव आणि संग्रामपूर तालुक्यातुन अकोला -खंडवा रेल्वे मार्ग जात आहे. परंतु ह्या प्रकल्पात ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जात आहेत त्यांना शासनाकडून जिरायती शेतजमिनी नुसार मोबदला दिला जात आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी जामोद व परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी बागायती शेतजमिनी नुसार मोबदला मिळावा यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय जळगांव जामोद यांना निवेदन देत आमरण उपोषण सुरू केले होते. त्यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांनी रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आश्वस्त केले होते की आपण महाराष्ट्रामध्ये कोठेही रेल्वेकरीता असा कुठलाही निवाडा जो बारमाही बागायती, हंगामी बागायती प्रमाणे झाला आहे. असा निवाडा माझ्या निर्दशनास आणुन द्यावा असे काही निवाडे झाले असतील तर त्यासंदर्भात मी वरिष्ठांचा अभिप्राय घेऊन आपणास दहा दिवसात लेखी स्वरूपात उत्तर देईल.
त्यानुसार अमरावती विभागातील रेल्वेचा नवीन मार्ग असणाऱ्या वर्धा-यवतमाळ-पुसद-नांदेडच्या भागातील बारमाही बागायती आणि हंगामी बागायतप्रमाणे पारित केलेले निवाडे लेखी स्वरूपातील प्रतिसह उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे सादर केले आहेत. त्यानुसार उचित भरपाई मिळण्याचा हक्क अधिनियम २०१३ नुसार रेकॉर्डवर घेवून त्याची शहनिशा करून तशा प्रकारचे आम्हा रेल्वे प्रकल्पात बाधीत शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावा. तसेच यासाठी आपण सांगितल्याप्रमाणे दहा दिवसात उचीत कारवाई करावी अशी विनंती शेतकऱ्यांनी केली आहे.
नाशिक, पुणे रेल्वे प्रकल्पात सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे, शिवाजीनगर व मानोरी ह्या गावांसाठी भूसंपादनाचे दर ७२ लाख रुपये हेक्टरी जाहीर झाले..मग विदर्भातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५ लाख रुपये दर का? विदर्भातील शेतकऱ्यांवर असा अन्याय का? असा प्रश्न परिसरातील सर्वच शेतकऱ्यांना पडला आहे. म्हणून रेल्वे प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी मागणी मान्य झाली नाहीतर यापेक्षाही तीव्र लढा देण्याचा इशारा ही यावेळी दिला. या निवेदनाची एक प्रत आमदार डॉ. संजय कुटे यांनाही देण्यात आली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : संतोष कुलथे