अकोला ३ डिसेंबर २०२३ : अकोला येथे झालेल्या ८० लाखाच्या चोरी प्रकरणात गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात अकोला एलसीबीला यश मिळाले आहे. २६ नोव्हेंबर रोजी अमरावतीहून पुण्याला जात असलेले व्यापारी राजू चेलाजी हे अकोला येथील पातूर वाशिम रोडवर असलेल्या प्रजापती क्वालिटी ढाब्यावर रात्री १० वाजता खाजगी ट्रॅव्हल्समधून जेवण करण्यासाठी उतरले. त्याचवेळी गाडीच्या सीटवरून अज्ञात चोरट्यांनी ८० लाखांची रोकड घेऊन पलायन केले होते.
प्रकरणाचे गांभीर्य पाहून अकोला एसपी संदीप घुगे यांनी तपास एलसीबीकडे सोपविला. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी व ह्या गुन्ह्यातील अज्ञात आरोपींना पकडण्यासाठी एलसीबी प्रमुख शंकर शेळके यांनी दोन पथके तयार केली त्यात एक शहरासाठी आणि दुसरे ग्रामीण भागासाठी..तसेच सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. तांत्रिक बाबी आणि गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीमुळे आरोपींचा माग काढण्यात मदत झाली.
मध्य प्रदेशातील धाड जिल्ह्यातील खैरवा गावातील आरोपी विनोद चौहान वय १९ याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता आरोपी विनोदने त्याच्या साथीदारासह ८० लाखांची चोरी केल्याची कबुली दिली. एलसीबीने आरोपींकडून ७९ लाखांची रोकड जप्त करून विनोदला ताब्यात घेतले. दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणात एसपी संदीप घुगे, ऍडीशनल एसपी अभय डोंगरे आणि एलसीबीच्या संपूर्ण टीमने भूमिका बजावली.
न्युज अनकट प्रतिनीधी : संतोष कुलथे